मुंबई - वडाळा पूर्व परिसरात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. वडाळा पूर्व परिसरात 60 टक्के झोपडपट्टी परिसर असल्याने कोरोना विषाणूचा वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी पालिका व पोलीस प्रशासन शर्तीचे प्रयत्न करीत आहेत. मात्र, वडाळा पोलिसांनी आपले कर्तव्य पार पाडतानाच जनसामान्यांत कोरोना विषाणूला आळा घालण्याबाबत जनजागृती करण्याचा विडा उचलला असून याअंतर्गत मंगळवारी १४ एप्रिलला वडाळा ब्रिज येथे मेगाफोनद्वारे पोलीस नाईक दीपक निकाळे यांनी देश भक्तीपर गाणी गाऊन, कोरोनाबाबत महत्व पूर्ण सूचना देत समाज प्रबोधन केले.
सदर उपक्रम राबविण्याची संकल्पना वडाळा पोलीस ठाणे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी शिंदे यांची होती. त्यानुसार कर्तव्यावरील पोलिसांनी करोना विषाणूबाबत घ्यावयाची दक्षता व लोकांच्या मनात करोना विषाणू रोगामुळे आलेली मरगळ तसेच राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याकरिता मार्गदर्शन केले. तर गायक म्हणून पोलीस नाईक दीपक निकाळे यांनी देश भक्तीपर गाणी गायली असून सहायक पोलीस निरीक्षक माने, जातेकर, पोलीस शिपाई पवार, रोकडे सहभागी झाले होते.