नांदेड : कोरोना काळात खासगी रुग्णालयात होत असलेल्या लुटीची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. परंतु बिलाची रक्कम येणे बाकी असल्याने मृत्यूनंतरही एका कोरोना रुग्णावर तब्बल तीन दिवस उपचार करण्याचा प्रताप नांदेडमधील गोदावरी हॉस्पिटलने केला आहे. मयताच्या पत्नीने या विषयाचा भंडाफोड केला असून, न्यायालयाच्या आदेशाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मुजामपेठ येथील अंकलेश पवार यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर त्यांना पत्नी शुभांगी पवार यांनी शहरातील गोदावरी हॉस्पिटलमध्ये १६ एप्रिल २०२१ रोजी दाखल केले होते. त्यावेळी त्यांच्याकडून अनामत म्हणून ५० हजार रुपये घेण्यात आले. त्यानंतर सातत्याने त्यांची प्रकृती खालावत असल्याने २० एप्रिल रोजी त्यांना आयसीयूमध्ये हलविण्यात आले. त्याच दिवशी ३५ हजार रुपयांचे इंजेक्शन द्यावे लागणार असून पैसे जमा करण्यास डॉक्टरांनी सांगितले. शुभांगी यांनी पैसे भरण्यासाठी मुदत मागितली होती. २४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता शुभांगी यांनी रुग्णालयात ९० हजार रुपये जमा केले. त्यानंतर दुपारी १२ वाजता त्यांना अंकलेश पवार यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. शुभांगी यांनी मृतदेह आणि उपचाराची कागदपत्रे मागितली; परंतु रुग्णालयाने ती देण्यास नकार दिला होता.
अखेर रुग्णालयाने त्यांच्या पतीचा मृतदेह ताब्यात दिला. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर २६ एप्रिल रोजी त्यांना उपचाराची कागदपत्रे देण्यात आली. त्यात अंकलेश पवार यांचे २१ एप्रिल रोजी १२ वाजता निधन झाल्याची नोंद होती. विशेष म्हणजे या तिन्ही दिवसांची बिले लावण्यात आली होती.
मृत्यू प्रमाणपत्रासाठीही मागितले होते पैसे शुभांगी यांनी पतीचे मृत्यू प्रमाणपत्र मागितले असता आणखी ४० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. या प्रकरणात शुभांगी यांनी ॲड. शिवराज पाटील लोहगावकर यांच्या मदतीने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गोदावरी हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.