नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात सध्या लॉकडाउन जारी करण्यात आलेलं आहे. लॉकडाऊन काळात जीवनावश्यक महत्वाच्या गोष्टी वगळता इतर सर्व गोष्टी या काळात बंद राहणार आहेत. मात्र, व्यसनापायी देशात काय - काय शक्कल लढवली जाईल याचा कोणीच अंदाज घेऊ शकत नाही. गुजरातमध्ये चक्क ड्रोनचा वापर करुन पानमसाल्याची विक्री करण्यात आली. याप्रकरणी दोघांना पोलिसांनीअटक केली आहे. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने ही धक्कादायक बाब उघडकीस आली.
गुजरात येथील मोरबी परिसरात ही घटना घडली. ड्रोनद्वारे पानमसाला विक्री करतानाचा व्हिडीओ टिकटॉकवर अपलोड करण्यात आला होता. यावरूनच पोलिसांना या घटनेची माहिती प्राप्त झाली. यानंतर पोलिसांनी कारवाई करत दोन व्यक्तींना बेड्या ठोकल्या आहेत. चौकशी केली असता या दोन्ही व्यक्तींनी दारुची विक्री करुनही पैसे कमावल्याचं उघडकीस आले आहे. लॉकडाऊन काळात मद्य - पानटपरी, तंबाखू विक्रीची सर्व दुकानं बंद आहेत. त्यामुळे व्यसनाधीन माणसं अस्वस्थ झाली असून ते छुप्या मार्गाने व्यसनाच्या वस्तू शोधाच्या प्रयत्नात असतात. त्यातच पोलीस अनेक ठिकाणाहून काळ्याबाजाराने या वस्तु विक्री करणाऱ्यांवर कारवाई देखील करत आहेत.