सुरत - कोरोनाचा प्रादुर्भाव संबंध देशभरात वाढत असल्याने कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी मोदी सरकारने कंबर कसली आहे. देशभरात ३ मेपर्यंत लॉकडाउन जारी करण्यात आलेला आहे. दरम्यान कोरोनाला आळा घालण्यासाठी सोशल डिस्टंसिंगचे पालन करून लोकांना विनाकारण घराबाहेर पडण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र, तरीदेखील सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवून लोकं रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे लोकांवर नियंत्रण ठेवताना पोलिसांवर तणाव निर्माण होत आहेत. मुंबईत वांद्रे येथे जमलेल्या जमावनंतर गुजरातमधीलसूरत शहरात जमावाने बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूरतचे पोलीस उपायुक्त आर.पी.बारोट यांनी दिली.
गुजरातमधील सुरत येथून एक धक्क्दायक घटना समोर आली आहे. सुरतमधील डायमंड बोर्स कार्यालयाच्या बाहेर मजुरांनी आक्रोश व्यक्त केला. यावेळी मजुरांनी दगडफेक केल्याची माहिती समोर आली आहे. लॉकडाऊन असतानाही त्यांच्याकडून काम करवून घेतलं जात आहे असा त्यांचा आरोप आहे. याशिवाय आम्हाला आमच्या गावी पाठवा, अशी मागणी मजुरांकडून केली जात आहे. यावेळी शेकडो संख्येने मजुर एकत्र जमा झाले होते. यामुळे सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी झाली होती.
तसेच सूरतमधील शहर भागात लॉकडाऊनच्या नियमांचे पालन होत नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यासाठी पोलिसांनी एक गाडी गस्तीवर निघाली होती. पोलिसांनी लोकांना घरात जाण्याचं आवाहन केलं. त्यावेळी संतापलेल्या काही लोकांनी पोलिसांच्या गाडीवर हल्ला केला. काही जणांनी पोलिसांच्या गाडीवर दगडफेकही केली. नंतर पोलिसांची कुमक मागवून पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं आहे. या हल्ल्यात एका पोलीस कर्मचाऱ्याला दुखापतही झाली आहे.