मुंबई - मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आलेला येस बँकेचा संस्थापक राणा कपूर याची शुक्रवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. मात्र, त्याला कारागृहात कोरोनाची लागण होण्याची शक्यता असल्याची भीती त्याच्या वकिलांनी विशेष न्यायालयात व्यक्त केली. येस बँकेवरील निर्बंध उठवले असले तरी राणा कपूरने कारागृहात कोरोनाची धास्ती घेतली आहे.
ईडीने ६२ वर्षीय कपूरला शुक्रवारी न्यायालयात हजर केले. न्यायाधीशांनी राणा कपूरला कोणता आजार आहे याबाबत विचारणा केली, त्यावेळी राणाने त्याला ६ - ७ वर्षांपासून दम्याचा आजार असल्याचे सांगितले. तसेच त्याची रोगप्रतिकारक क्षमता खूप कमी झाली असल्याचे त्याने पुढे सांगितले. राणा कपूरचे वकील अबाद पोंडा यांनी न्यायालयाला सांगितले की, ज्या व्यक्तीची रोगप्रतिकारक क्षमता कमी असेल त्यांना कोरोना व्हायरस होण्याची शक्यता आहे.
राणा कपूर यांचे वकील पोंडा म्हणाले की, "कोरोना विषाणू खूप वेगाने पसरत आहे. सध्या परिस्थिती अत्यंत संवदेनशील बनली आहे." जर राणा तुरुंगात गेला तर तो अत्यंत गंभीर विषाणूच्या विळख्यात अडकू शकतो. त्यावर कोर्टाने जेल प्रशासनाला राणा कपूरची योग्य काळजी घेऊन औषधे उपलब्ध करुन देण्यास सांगितले आहे. ईडीने राणा कपूरच्या कोठडीत मुदतवाढ मागितली नाही, त्यामुळे न्यायाधीश परशुराम जाधव यांनी त्यांना २ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.राणा कपूर याला या महिन्याच्या सुरुवातीलाच प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग अॅक्ट अंतर्गत ईडीने अटक केली. ईडीच्या म्हणण्यानुसार, राणा कपूर येस बँकेचे कामकाज सांभाळत असताना त्याने ३० हजार कोटी रुपये कर्ज दिले. त्यातील २० हजार कोटी रुपये बुडीत निघाले. सीबीआयही तपास करीत आहे. राणा कपूर याला सीबीआय कोर्टापुढे हजर करण्यासाठी सीबीआयने प्रोडक्शन वॉरंट मिळवल्याचे पोंडा यांनी सांगितले.