भंडारा : थकीत वेतन देयक मंजुरीस पाठविण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेताना तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथील श्रीराम हायस्कुलचा मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात अडकला. ही कारवाई भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने मंगळवारी सकाळी १० वाजता केली.
श्रीकांत बाबुराव साखरवाडे असे लाचखोर मुख्याध्यापकाचे नाव आहे. तो श्रीराम हायस्कुलचा मुख्याध्यापक आणि श्रीराम शिक्षण संस्थेचा सचिव आहे. चौथ्या वेतन आयोगाचे थकबाकीचे देयक तयार करुन देणे, जुलै १९९९ ते जुन २००१ चे थकीत वेतन देयक पथकाकडे पाठविणे आणि सेवा समाप्ती प्रकरणातील २००३ ते २००७ या सेवानिवृत्ती कालावधीतील काल्पनीक वेतन वाढ लावुन सेवापुस्तिका अद्ययावत करणे आणि शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठवणे यासाठी तक्रारदाराच्या सासऱ्याला पन्नास हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार करण्यात आली. चौकशी करुन मंगळवारी सकाळी सापळा रचण्यात आला. सकाळी १० वाजताच्या सुमारास देव्हाडी येथे १० हजार रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईने तुमसरच्या शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अपर पोलीस अधीक्षक राजेश दुद्दलवार, मिलिंद तोतरे, पोलीस उपअधीक्षक महेश चाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, कुरंजेकर, रोशनी गजभिये, सुनील हुकरे, दिनेश धार्मीक, राजेंद्र कुरुडकर, कुणाल कडव, दिपीका राठोड यांनी केली.