मुंबई : कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारावरील औषधांचे बनावटीकरण करून मोठ्या प्रमाणात विकले जात असल्याची धक्कादायक माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या कारवाईतून उघड़कीस आले आहे. याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली असून तिच्याकड़ून ६७ लाख ९० हजार किंमतीचे बनावट अँटी कॅन्सरवरील इंजेक्शन आणि गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.
गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, जपानच्या ओशाका फार्माक्यूटील कंपनीच्या नावाचा वापर करत या औषधाची विक्री सुरु होती. यामुळे कंपनीलाही मोठ्या प्रमाणात फटका बसत होता. कंपनीला याबाबत समजताच, त्यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून आर्थिक गुन्हे शाखेच्या गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला. तपासात, या गोळ्यांचे आणि इंजेक्शनचा बनावटीकरण कल्याणच्या एका कंपनीत होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेकड़ून छापा टाकल्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बनावट औषधांचा साठा सापडला.
यामध्ये इंजेक्शनचे ७ बॉटल ज्याची प्रत्येकी किंमत ५ लाख ८० हजार आणि गोळ्यांचे २ बॉक्स ज्यांची प्रत्येकी किंमत १३ लाख ५० हजार आणि १ लॅपटॉप,१ मोबाईल असे एकूण ६७ लाख ९० हजार रुपयांचे मुद्देमाल जप्त करण्यात आलं. या औषधाची मुंबईसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणी विक्री सुरु होती. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करत आहेत.