मुंबई : कॉल सेंटरमध्ये नोकरी करताना स्वत:चे बोगस आंतराष्ट्रीय कॉल सेंटर थाटले. देशभरात २०० जणांची साखळी उभी केली. गेल्या पाच वर्षांत अमेरिका आणि कॅनडामधील नागरिकांची कोट्यवधी डॉलर्सना फसवणूक करणाऱ्या निशांत नागराज शिरसिकर (३०) याला गुुन्हे गुप्तवार्ता विभागाने (सीआययु) बेड्या ठोकल्या आहेत.त्याच्याकडून ४० लाख रुपयांच्या रोख रकमेसह १० लाखांची सोन्याची बिस्किटे आणि अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. मूळचा कर्नाटकचा रहिवासी असलेला निशांत मालाड परिसरात भाडेतत्त्वावर राहायचा. सीआययुचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना याबाबत माहिती मिळताच, पथकाने २९ आॅगस्ट रोजी निशांतला मालाड येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे पाच लाखाच्या रोख रकमेसह गांजाने भरलेली सिगारेट आणि चोरीची दुचाकी मिळून आली. त्यानुसार बांगुरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करत, त्याला अटक करण्यात आली. चौकशीत तो घरातूनच गेल्या ५ वर्षांपासून बोगस आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर चालवत असल्याचे स्पष्ट झाले. त्याने साथीदारांच्या मदतीने भारतातील विविध शहरांमधून मोबाइल फोनद्वारे अमेरिका, कॅनडामधील नागरिकांना लक्ष्य करत, कोट्यवधी डॉलर्सना गंडविले आहे. ही मंडळी महसूल सेवा, युएसए सिटिझनशिप किंवा इमिग्रेशन अधिकारी असल्याचे भासवून सरकारकडे थकबाकी रक्कम न भरल्यास अटक, तुरुंगवास, दंड, हद्दपारीची भीती घालून पैसे उकळत होते. यात, डाटा ब्रोकर आणि अन्य स्रोतांकड़ून मिळालेल्या माहितीच्या आधारे फसवणूक सुरू होती. त्याच्या कोठडीत ४ तारखेपर्यंत वाढ करण्यात आली आहे.आॅनलाइन दिले ट्रेनिंगदेशभरात निशांतने २०० जणांची साखळी तयार केली. त्याच्यासोबत काम करणाऱ्यांना तो कधी आॅनलाइन तर कधी भेटून ट्रेनिंग देत असे. त्यांना डाटा पुरविल्यानंतर त्याने तयार केलेली स्क्रिप्ट फक्त संबंधित कॉलधारकाशी बोलताना वाचून दाखविण्यास सांगत असे. पुढे सावज अडकताच हवाल्यामार्फत पैसे त्याच्याकडे पोहोचत होते.
घरातूनच सुरू होते बनावट आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर, अमेरिका, कॅनडामधील नागरिकांना कोट्यवधीचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2020 2:36 AM