जळगाव : तालुक्यातील वावडदा शिवारातील बनावट दारूचा कारखाना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकून उद्ध्वस्त केला. ही कारवाई गुरूवारी रात्री १०.३० वाजता करण्यात आली. या कारवाईत एकूण २ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयित आरोपी संजय रमण देवरे (५१, रा़ वावडदा) याच्यासह तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. तर संजय याला अटक करण्यात आली आहे.
वावडदा शिवारातील म्हाळसाई क्रशिंग कंपनीजवळ बनावट दारूचा कारखाना सुरू आल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या पोलीस अधीक्षिका सिमा झावरे यांना मिळाली होती. पथकाने जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये १ लाख ३१ हजार ४६० रुपये किंमतीच्या बनावट देशी टँगो (१८० एमएल)च्या २ हजार १९१ बाटल्या तसेच ७५ हजार ३०० रुपये किंमतीच्या मॅक्डॉल नं-१ (१८०एमएल) च्या ५०२ सीलबंद बाटल्या, ३ हजार ५०० रुपये किंमतीच्या दोन ३५ लीटर ड्रम (मद्याने भरलेला), १४ हजार किंमतीचे बॉटलिंग मशिन, १६ हजार रुपये किंमतीचे बुच, ७०० किमतीच्या रिकाम्या बाटल्या, मद्यार्काचे दोन ड्रम, उपकरण, मद्य तयार करण्यासाठी लागणा-या वस्तू असा एकुण २ लाख ६० हजार १० रुपये किंमतीचा मुद्देमालाचा समावेश आहे. दोन तास ही कारवाई सुरू होती.