उत्तराखंडच्या पौडी गढवाल पोलिसांनी एका सुंदर मुलीला आणि तिच्या बॉयफ्रेंडला अटक केली आहे. हे प्रेमी जोडपं लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने रस्त्यावरील वाहन चालकांना त्यांच्या जाळ्यात ओढते आणि लूट करते. मुलीच्या सौंदर्याला भुलून वाहन चालक तिच्या नजरेत घायाळ होतात त्याचाच फायदा घेत मुलगी चालकांना हॉटेलवर घेऊन जाते. तिथे अश्लील व्हिडिओ बनवते. त्यानंतर आरोपी जोडपे मिळून पीडित व्यक्तीला ब्लॅकमेल करतात. गेले कित्येक महिने त्यांचा हा प्रकार सुरू आहे.
याबाबत पोलीस तक्रार मिळाल्यानंतर तपास सुरू केला तेव्हा हे दोघे प्रेमी युगल तावडीत सापडले. सूत्रांनुसार, आतापर्यंत या जोडप्याने ५० हून अधिक लोकांना बळीचा बकरा बनवलं आहे. यातील आरोपी प्रियकर उत्तर प्रदेशातील बिजनौर इथल्या ताहारपूर गावात राहणारा हरविंदर सिंह आहे तर मंडावली इथे राहणारी त्याची गर्लफ्रेंड निधी शर्मा अशी त्यांची नावे आहेत.
५० लोकांहून अधिक जणांना लुटले
निधी एखादं सावज शोधण्यासाठी निर्जन रस्त्यावर उभी राहते. तिथे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांकडून लिफ्ट मागते. जर कुणी तिला लिफ्ट दिली तर ती अलगद त्या व्यक्तीला तिच्या जाळ्यात ओढते. त्यानंतर वाहन चालकाला हॉटेलवर घेऊन जाते तिथे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवले जातात. त्यानंतर खोलीत अचानक तिचा प्रियकर येतो. मग हे दोघे मिळून संबंधित व्यक्तीला धमकावून पुढील ब्लॅकमेलिंगचा खेळ सुरू करतात.
या आरोपींच्या चौकशीत त्यांनी आतापर्यंत ५० हून अधिक लोकांसोबत फसवणूक केल्याचं उघड झाले आहे. प्रतिमा मलिन होईल या भीतीने बरेच जण पोलीस तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत. कोटद्वारमध्ये राहणाऱ्या एकाने तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. एक मुलगा आणि मुलगी त्याला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत असल्याचं पीडित व्यक्तीने तक्रार केली. त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा दोघे पोलिसांच्या तावडीत सापडले. हे आरोपी प्रेमी युगल खूप शातीर असून आवश्यक चौकशीनंतर त्यांना कोर्टात हजर केले तेव्हा कोर्टाने त्यांना जेलमध्ये पाठवले आहे.