पालघर : प्रेमप्रकरणातून जम्मू काश्मीरमधून पळून आलेल्या आणि पालघरमध्ये वास्तव्यास असलेल्या प्रेमी युगुलाचा शोध घेण्यास पालघर-काश्मीर पोलिसांच्या टीमला यश आले आहे. अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी जुल्फिकार मोहमद सादिक खटाना (वय २२) याला काश्मीर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.जम्मू काश्मीरच्या राजौरी पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या एका गावात राहणारा आरोपी तरुण जुल्फिकार याचे आपल्या जवळच राहत असलेल्या अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध जुळले. या प्रेमसंबंधाला विरोध होऊ लागल्यानंतर प्रेमात आकंठ बुडालेल्या युगुलाने जम्मू-काश्मीरमधून पळ काढला. या प्रकरणी ५ मार्च रोजी राजौरी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. राजौरी पोलिसांनी आरोपीच्या मोबाइलचे लोकेशन ट्रेस केल्यावर ते विविध भागांत आढळून येत होते. पोलिसांनी याचा तपास सुरूच ठेवल्यानंतर आरोपीने आपला मोबाइल स्विच ऑफ करून ठेवल्याने अनेक दिवस त्याचा शोधच लागत नव्हता, मात्र काही दिवसांनंतर आरोपी तरुणाने आपला बंद ठेवलेला मोबाइल सुरू केल्यावर त्यावर तरुणाचे लोकेशन जोगेश्वरी, मुंबई आढळून आले. पोलिसांनी अधिक शोध घेतला असता जुल्फिकार याच्या ओळखीच्या व्यक्तीकडे जोगेश्वरीमध्ये राहत असल्याचे कळल्यावर राजौरी पोलिसांनी जुल्फिकार याच्याशी संपर्क साधत कुठेही जाऊ नकोस, आम्ही आपणास न्यायला येतो, असे कळवले.पकडतील या भीतीने काढला पळआपणास पोलीस पकडतील या भीतीने त्या प्रेमी युगुलाने जोगेश्वरीमधून पळ काढला. त्यांनी लोकल पकडून सरळ पालघर गाठत नवलीच्या विष्णूनगरमधील एक रूम भाड्याने घेतली. मागील ८-१० दिवस ते पालघरमध्ये राहिल्यानंतर पालघर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक रमेश पालवे आणि महिला पोलीस कदम यांच्या मदतीने राजौरी पोलिसांनी या युगुलाला ताब्यात घेतले. एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी राजौरी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला असून, शुक्रवारी या दोघांना घेऊन राजौरी पोलीस जम्मू-काश्मीरकडे रवाना झाले.
काश्मीरमधून पळालेल्या प्रेमी युगुलाला अटक; मुलगी अल्पवयीन, प्रेमसंबंधाला कुटुंबीयांचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 10:02 AM