प्रेमी युगुल घरातून पळाले, संतप्त मुलीच्या कुटुंबीयांनी मुलाचे घर जाळले, प्रेयसी म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 06:10 PM2021-09-13T18:10:28+5:302021-09-13T18:10:41+5:30
Crime News: मध्य प्रदेशमधील रायसेन जिल्ह्यामधील एका गावामध्ये प्रेमप्रकरणामधून सुरू झालेला वाद जाळपोळीपर्यंत पोहोचला.
भोपाळ - मध्य प्रदेशमधील रायसेन जिल्ह्यामधील एका गावामध्ये प्रेमप्रकरणामधून सुरू झालेला वाद जाळपोळीपर्यंत पोहोचला. येथील कुंडाली गावातील एक प्रेमी युगुल घरातून पळून गेले. त्यामुळे संतप्त झालेल्या मुलीच्या कुटुंबीयांनी मुलाच्या घरावर हल्ला केला आणि घर पेटवून दिले. तसेच तिथे उभ्या असलेल्या गाड्याही जाळल्या. तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गावात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (The couple ran away from home, the angry girl's family set fire to the boy's house )
रायसेन जिल्ह्यातील कुंडाली गावामध्ये एक प्रेमी युगुल घरातून पळून गेले. पळून गेलेला मुलगा साहू समाजातील आहे. तर मुलगी ही लोधी समाजातील आहे. त्यामुळे गावातील साहू आणि लोधी समाजात वाद होऊन आमने-सामने आले. तसेच मुलीच्या कुटुंबीयांनी मुलाच्या घरावर हल्ला केला. त्यामुळे चार जण जखमी झाले. हल्ल्यामध्ये दोन घरांसह कार, आणि बाईकला आग लावली. त्यामुळे प्रशासन अलर्ट झाले आणि रात्रीपासून गावात पोलिसांचा पहारा तैनात करण्यात आला.
आता पोलिसांनी जाळपोळीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. प्रशासनाने पीडित कुटुंबातील सदस्यांना सुरक्षित ठिकाणी पाठवले आहे. या घटनेची माहिती समजताच मुलीने एक व्हिडीओ तयार करून व्हायरल केला आहे. त्यात ती म्हणते की, आम्ही आपल्या मर्जीने विवाह केले आहे. त्यामुळे विनाकारण गोंधळ घालू नका. माझा पती किंवा त्याच्या कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न करू नका. त्यांना त्रास दिल्यास त्याचे जबाबदार माझे कुटुंबीय असतील. मी सज्ञान आहे आणि आणि आपापल्या मर्जीने विवाह केला आहे.
रायसेन जिल्ह्यातील कुंडली गावात लोधी समाज बहुसंख्य आहे. साहू समाजाचे लोक येथे खूप कमी आहेत. मुलीकडच्यांनी कारस्थान करून घरावर हल्ला केला. यामध्ये चार जण जखमी झाले. अंधाराचा फायदा घेऊन दोन घरांमध्ये आग लावली. यामध्ये चार जण जखमी झाले. तसेच घराशेजारी उभी असलेली कार आणि दुचाकीही जाळण्यात आली.