लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : ते दोघेही विवाहित. तिला चार मुले तर तो एका गोंडस बाळाचा बाबा; मात्र दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले अन् त्यांनी आपल्या जोडीदारांची मुला-बाळांची अन् संसाराची पर्वा न करता धूम ठोकली. त्यानंतर खऱ्या जोडीदारांना त्यांच्या प्रेमाची भनक लागली अन् दोघांनीही पोलीस ठाणे गाठून साहेब, आमचा जोडीदार शोधून आणा, अशी दाद मागितली. लग्न, लव्ह अन् लोचा... असा हा प्रसंग पाहून पोलीसही चक्रावून गेले.
शहरातील शिवाजीनगर ठाण्यात शनिवारी एक विवाहित महिला आपल्या तान्हुल्याला कडेवर घेऊन आली. तिच्या मागोमाग एक तरुण आला. महिला हवालदार मीरा रेडेकर यांनी महिलेची चौकशी केली. भरल्या डोळ्यांनी तिने कैफियत सांगायला सुरुवात केली. तिच्या पतीचे सोबत आलेल्या तरुणाच्या पत्नीशी प्रेमप्रकरण सुरू असून, ते दोघे घरात न सांगता पळून गेल्याचे तिने सांगितले. त्यानंतर सोबतचा तरुण आपले गाऱ्हाणे सांगत म्हणाला की, तो हॉटेलात काम करतो, त्यास चार अपत्ये आहेत. तो दिवसभर हॉटेलात कामाला जायचा. इकडे पत्नीचे यांच्या पतीशी कनेक्शन कधी जुळले, हे मला कळालेच नाही. तेव्हा माझ्या पत्नीला परत आणून द्या तर महिलेने माझ्या पतीला यांच्या पत्नीपासून सोडवा व शोधून आणा, असा सूर लावला.
पोलिसांनी खोलवर विचारपूस केली तेव्हा ते दोघे पळाले म्हणजे शहर सोडून गेले, असे नाही तर शहरातच वेगळी खोली घेऊन ते राहत असल्याची माहिती समोर आली. याबाबत शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक केतन राठोड म्हणाले की, अशा प्रकारची कुठली तक्रार माझ्यापर्यंत आली नाही, असे त्यांनी सांगितले.
पोलिसांपुढे पेच
दोघांचाही जोडीदार शोधून आणण्यासाठी ते बेपत्ता असल्याची नोंद आवश्यक आहे, त्याशिवाय त्यांना शोधायचे कसे, असे सांगितल्यावर विचार करून तक्रार देऊ, असे सांगून ते दोघेही निघून गेले; मात्र पळालेल्या प्रेमीयुगुलाचे जोडीदार सोबतच ठाण्यात गाऱ्हाणे घेऊन आल्याच्या प्रसंगाने पोलिसांपुढेही पेच उभा केला.