उज्जैन – शहरातील क्षिप्रा नदीच्या किनारी राम घाटवर एक धक्कादायक खुलासा उघड झाला आहे. याठिकाणी एक दाम्पत्य लहान मुलाला व्हिलचेअरवर बसवून भीक मागत होतं. या मुलाच्या पायात पट्टी बांधण्यात आली होती. परंतु काहींना या मुलावर संशय आल्यानं पायावरची पट्टी हटवण्यात आली तेव्हा सर्वजण हैराण झाले. मुलाच्या पायावर कुठलीही जखम नव्हती. इतकचं नाही तर जेव्हा मुलाच्या पायावरची पट्टी काढण्यात आली तेव्हा त्या मुलाने व्हिलचेअरवरुन उठून पळून गेला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होऊ लागला आहे.
काय आहे ही घटना?
दाम्पत्य व्हिलचेअरवर लहान मुलाला बसवून भीक मागत होते. तेव्हा घाटावर तैनात असलेल्या सुरक्षा सैनिकांना त्याच्यावर शंका आली. जवानांनी भीक मागणाऱ्या त्या कुटुंबाला अडवलं. सुरक्षा जवानांनी दाम्पत्यांना सांगून मुलाच्या पायावर बांधलेली पट्टी उघडण्यास सांगितली. सुरुवातीला दोघांनीही असं करण्यास नकार दिला. परंतु पोलिसांचा धाक दाखवताच ही पट्टी काढण्यास दाम्पत्य तयार झाले. जेव्हा मुलाच्या पायावरची पट्टी खोलण्यात आली तेव्हा सगळेच हैराण झाले. व्हिलचेअरवर बसलेल्या मुलाच्या पायाला कुठलीही जखम झाली नव्हती किंवा त्यांच्या पायावर दुखापत झाली नव्हती.
जेव्हा सुरक्षा रक्षकांनी या मुलाला उठण्यास सांगितले तेव्हा तो उभा राहताच पळून गेला. त्याठिकाणी उपस्थित असणाऱ्या एकानं संपूर्ण घटनेचा व्हिडीओ बनवला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. तो प्रचंड व्हायरल होत आहे. परंतु हा व्हिडीओ कधीचा आहे याची माहिती अद्याप मिळाली नाही. एखाद्या धार्मिक स्थळी लोकांच्या भावनेशी अशाप्रकारे खेळलं जात असून भीक मागण्याच्या गोरखधंद्याविरोधात स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्हा प्रशासन अशा फसवणूक करणाऱ्या लोकांविरोधात काय कारवाई करतं? हे पाहणं गरजेचे आहे. मात्र सोशल मीडियावर अनेकदा असे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वी दिव्यांगाचं नाटक करून लोकांकडून भीक मागणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात त्याने हात नसल्याचं नाटक केले होते. मात्र हा हात पाठीमागे बांधल्याचं दिसून आलं होतं.