लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : ऑनलाईन पद्धतीने पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी असलेल्या ‘फोन पे’ची ऑफर आहे, अशी बतावणी करून एका व्यक्तीने येथील देशमुख दाम्पत्याची आर्थिक फसवणूक केली. यामाध्यमातून त्याने ५५ हजार ९८७ रुपये हडपले. याप्रकरणी फसगत झालेल्या देशमुख यांनी पोलिसांत धाव घेऊन तक्रार केली.प्राप्त माहितीनुसार, रिसोड येथील देशमुख गल्ली येथील रहिवासी गीता गजानन देशमुख व गजानन दिनकरराव देशमुख या दाम्पत्याचे एचडीएफसी बँकेत खाते आहे. त्या खात्याला त्यांनी ‘फोन पे’ करून घेतले आहे. त्यावरून ते दैनंदिन व्यवहार करतात. त्यांना राहुल नामक युवकाचा एक फोन आला व तुम्हाला ‘फोन पे’ची ऑफर आहे असे सांगून ओटीपी क्रमांक मागितला. त्यास तो दिल्यानंतर गीता देशमुख यांच्या खात्यातून ३२ हजार ९९२ आणि गजानन देशमुख यांच्या खात्यातून २२ हजार ९९५ रुपये गायब झाले. याप्रकरणी गजानन देशमुख यांनी रिसोड पोलिसांत तक्रार दाखल केली असून फसवणूककर्त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
‘फोन पे’च्या ऑफरची बतावणी करून दाम्पत्याची आर्थिक फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 11:00 AM