मुंबई - लोअर परेल परिसरात एका कुरिअर बॉयवर चाकुने हल्ला करून त्याच्याकडील रोख रक्कम अणि दागदागिने असा एकूण २ कोटींचा ऐवज पळविल्याची धक्कादायक घटना घडली होती. ही घटना २८ ऑक्टोबर रोजी लोअर परळ परिसरात घडली होती. याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता असून पोलिसांच्या अथक प्रयत्नांनंतर चार आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. सुरेश डोके (वय ३६, राहणार - घोड़पदेव), महेंद्र चौधरी उर्फ मारवाड़ी उर्फ गुरबित (वय ३६, राहणार - भायखळा), सतीश फकीरा सानप उर्फ सत्या (वय २९, राहणार -संगमनेर), विलास हनुमंत पवार उर्फ मामा (वय २५, राहणार - घोड़पदेव) अशी अटक आरोपींची नावे आहेत. या आरोपींकडून १ कोटी १५ लाख ७३ हजार ४३ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात गुन्हे शाखेच्या कक्ष - ३ ला यश आले आहे.
मुकेश बुखार असं या कुरिअर बॉयचं नाव आहे. मुकेश हा मुंबई विमानतळावर एक कुरिअर आणण्यासाठी गेला होता.विमानतळावरून त्याने कुरिअर ताब्यात घेतले आणि तो पुन्हा लोअर परेल येथे येण्यासाठी निघाला होता. अशातच रस्त्यात त्याचा पाठलाग करणाऱ्या दोघांनी मुकेशवर चाकूने हल्ला केला. दरम्यान, मुकेशने स्वतःचा बचाव करण्यासाठी या दोघांचा प्रतिकार करण्यास सुरुवात केली. मात्र, हल्लेखोरांनी मुकेशच्या हातावर चाकूने प्रहार केला आणि त्याच्या हातातील बॅग हिसकावून पळ काढला. या घटनेमुळे घाबरलेल्या मुकेशने तात्काळ याची माहिती मालकाला दिली होती. मालकाने ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल केला होता. या बॅगेत रोख रककम आणि दागदागिने असा २ कोटींचा ऐवज होता असून पोलिसांनी दहा दिवसांत आरोपींचा माग काढला आहे.