बंगळुरू - कर्नाटक हायकोर्टाने द्विभार्याविवाहाबाबत आपल्याविरोधात दाखल याचिका फेटाळून लावण्यासंबंधात एका ७६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे. आपल्याला तीन पत्नी असल्याचे या वृद्धाने मान्य केले आहे. दरम्यान, आरोपीची कबुली ही त्याच्या गुन्ह्यातील सातत्य दाखवणारे आहे, असे कोर्टाने नमूद केले आहे.
आनंद सी उर्फ अंकुर गौडा याची पहिली पत्नी चंद्रमा हिने पतीसह त्याची तिसरी पत्नी वरलक्ष्मी आणि तिचे चार मित्र आणि नातेवाईकांविरोधात दुसऱ्या विवाहावरून गुन्हा दाखल केला होता.
आनंद सी याने १९६८ मध्ये चंद्रम्मा हिच्याशी विवाह केला होता. त्यानंतर त्याने १९७२ मध्ये सावित्राम्मा हिच्याशी विवाहा केला. आनंदने दावा केला की चंद्रम्मा हिने दुसऱ्या विवाहासाठी परवानगी दिली होती. त्यानंतर आनंदने १९९३ मध्ये वरलक्ष्मी हिच्याशी विवाह केला आणि त्याच्या पहिल्या दोन पत्नींनी तिसऱ्या विवाहासाठी मान्यता दिली होती, असा दावा उच्च न्यायालयासमोर केला.
दरम्यान चंद्रम्मा हिने दुसऱ्या विवाहाची तक्रार २०१८ मध्ये नोंदवली होती. तिने आरोप केला की, आनंदने वरलक्ष्मीशी विवाह करताना आपले आधीचे विवाह लपवले होते.
दरम्यान, आनंद त्याची तिसरी पत्नी आणि इतर आरोपींनी लग्नानंतर तब्बल २५ वर्षांनी तक्रार नोंद झाली आहे, असा तर्क मांडत याला न्यायालयात आव्हान दिले होते. तसेच तिसऱ्या विवाहासाठी आधीच्या दोन पत्नींनी मान्यता दिली होती. तसेच तीन पत्नींशी संबंधित एका मालमत्तेच्या वादानंतर ही तक्रार दाथल करण्यात आल्याचा दावा आनंद याने केला होता.
आनंदच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती एम. नागप्रसन्ना यांनी आपल्या २५ मे रोजीच्या निर्णयामध्ये सांगितले की, आनंद आणि त्यांची तिसरी पत्नी यांच्याविरोधातील खटला रद्द करता येणार नाही. कारण आधीच्या लग्नांबाबत त्यांना माहिती होती. मात्र आनंद याच्या मित्रांविरोधात दाखल असलेला दुसऱ्या विवाहासाठी उत्तेजन दिल्याचा खटला कोर्टाने रद्द केला आहे.