मडगाव - आपल्या मृत वडिलाच्या ट्रेड लायसन्ससाठी पालिकेकडे अर्ज केलेल्या एकावर फसवेगिरीचा गुन्हा नोंद करण्याचा आदेश गोव्यातील मडगाव येथील प्रथमवर्ग न्यायालयाने पोलिसांना दिला आहे. सुरेश मंगिलाल प्रजापत असे संशयिताचे नाव असून, याच्याविरुध्द फसवणूक करणे, बनवेगिरी करणे आणि अन्य गुन्हा नोंद करण्याचा आदेश आज मडगाव प्रथम वर्ग न्यायालयाने दिला आहे. न्यायाधीक्ष शिल्पा पंडीत यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला आहे. अनंत केसरकर हे तक्रारदार आहेत. मडगाव पोलिसांतर्फे सरकारी वकील सुभाष देसाई यांनी युक्तिवाद केला.
या घटनेची पार्श्वभूमी अशी की , अनंत केसरकर याने मडगाव येथे मंगिलाल प्रजापत याला कमल स्वीट मार्ट भाडेपटटीवर चालविण्यास दिले होते.मंगिलाल याचे ३१ जुलै २0१0 रोजी निधन झाले होते. वडिलाच्या निधनाची माहिती सुरेशने लपवून ठेवली होती. ६ जानेवारी २0१५ साली मडगाव पालिकेत अर्ज करुन सुरेश याने वडिलाच्या नावे ट्रेड लायसन्स मागितले होते. अर्जावर मंगिलाल याची बनावट स्वाक्षरी केली होती. ही स्वाक्षरी खोटी असल्याचे अनंत केसरकर याने मडगाव पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी वाय . बी. तावडे यांच्या नजरेस आणून दिले होते. मागाहून ट्रेड लायसन्ससाठी दिलेला परवाना मागे घेतला होता.
केसरकर यांनी मडगाव पोलीस ठाण्यात सुरेश मंगिलाल प्रजापत याच्या विरोधात फसवणुकीची तक्रार नोंदविली होती. मात्र पोलिसांनी गुन्हा नोंद करुन न घेतल्याने तक्रारदाराने प्रथमवर्ग न्यायालयात अर्ज केला होता. हा अर्ज न्यायालयाने मंजूर करुन सुरेश प्रजापत याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्याचा पोलिसांना आदेश दिला आहे.