दलित वसाहतीला आग लावणाऱ्या 101 जणांना न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 02:53 PM2024-10-25T14:53:33+5:302024-10-25T14:56:14+5:30
10 वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेत आरोपींना आता मिळाली शिक्षा.
कोप्पल : कर्नाटकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. दलित समाजाच्या वस्तीला आग लावल्याप्रकरणी कोप्पल जिल्हा न्यायालयाने 101 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या आरोपींना अलीकडेच न्यायालयाने दोषी ठरवले होते, तर काल(गुरुवारी) शिक्षा सुनावण्यात आली. ॲट्रॉसिटी प्रकरणात एवढ्या मोठ्या संख्येने आरोपींना जन्मठेपेची शिक्षा होण्याची राज्याच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे.
सुनावनीवेळी सर्व आरोपींचे कुटुंबीय कोप्पल न्यायालयाच्या संकुलात जमले होते. न्यायालयाने शिक्षा सुनावताच कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. दरम्यान, आरोपींना सध्या कोप्पल जिल्हा कारागृहात नेण्यात येणार असून, पुढे त्यांना बल्लारी कारागृहात ठेवण्यात येईल.
काय आहे प्रकरण?
28 ऑगस्ट 2014 रोजी गंगावती तालुक्यातील मरकुंबी गावात जातीनिहाय हिंसाचाराची घटना घडली होती. दलितांना न्हाव्यांची दुकाने आणि ढाब्यांमध्ये प्रवेश नाकारण्यात आल्याने अचानक हाणामारी सुरू झाली. गावातील अस्पृश्यतेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या काही दलित तरुणांच्या सक्रियतेमुळे संतप्त झालेल्या आरोपींनी दलित वसाहतीत घुसून त्यांच्या झोपड्या पेटवून दिल्या आणि अनेकांवर हल्ला केला होता.
सुनावणीदरम्यान 16 आरोपींचा मृत्यू झाला
या घटनेमुळे राज्याच्या अनेक भागांत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या घटनेनंतर पीडितांना पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी 117 लोकांना आरोपी बनवले. गेल्या दहा वर्षांपासून या खटल्याची सुनावणी सुरू होती. आता अखेर या खटल्याचा निकाल लागला. दरम्यान, गेल्या दहा वर्षात आरोपींपैकी 16 जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित 101 आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.