पलवल – हरियाणाच्या पलवल जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी हत्येच्या आरोपात कोर्टातून निर्दोष सुटलेल्या एका युवकाला तिघांनी अंधाधुंद गोळ्या झाडल्या आहेत. गोळी लागल्याने हा युवक गंभीर जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर पोलिसांनी या घटनेबाबत तिघांविरोधात गुन्हा नोंद करून तपासाला सुरूवात केली आहे.
जखमी युवकाच्या नातेवाईकांचे म्हणणं आहे की, २०१५ रोजी गावातील रविंद्र उर्फ रवीच्या वडिलांची कोणीतरी हत्या केली होती. या प्रकरणात रवीने युवकाचं नाव आरोपीच्या संशयित यादीत टाकलं होतं, पोलिसांनी त्याला अटक केली आणि जेलमध्ये टाकलं, कोर्टात याबाबत सुनावणी सुरू होती, त्यानंतर ठोस पुरावे नसल्याने युवकाची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. मात्र वडिलांची हत्या केल्याचा राग रवीच्या मनात कायम होता.
युवक जेव्हा गुलाबद येथून गावात परतत होतो त्यावेळी रस्त्यात रविंद्र उर्फ रवीने त्याच्या दोन सहकाऱ्यांसोबत युवकाला घेरलं आणि त्याच्यावर अंधाधुंद गोळीबार केला असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. पहिली गोळी युवकाच्या हातात लागली तर दुसरी पाठीला लागली, त्यामुळे बाईकसह युवक बाजूच्या शेतात पडला, त्यानंतर रविंद्र आणि त्याचे साथीदार त्याच्याजवळ गेले, आरोपी रविंद्रने म्हटलं की, कोर्टानं वाचवलं पण माझ्यापासून कोण वाचवणार? असं सांगत डोक्याच्या मागच्या बाजूस गोळी घातली, त्यानंतर साथीदारांनी रविंद्रला तेथून निघून जाण्यास सांगितले असा नातेवाईकांचा दावा आहे.
सध्या या संपूर्ण प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहेत, घटनेची माहिती मिळताच जखमी युवकाचे वडील घटनास्थळी पोहचले आणि युवकाला रुग्णालयात घेऊन गेले. युवकावर दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी रविंद्र उर्फ रवी आणि त्याच्या २ सहकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंद केला आहे, सध्या आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.