मंत्र्याच्या भावाला कोर्टाने दिला दणका; अटकपूर्व जामीन फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 07:05 PM2020-02-27T19:05:43+5:302020-02-27T19:10:14+5:30
प्रकाश नाईक मृत्यू प्रकरण
पणजी - मेरशीचे माजी सरपंच प्रकाश नाईक यांच्या मृत्यु प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आल्यावर अटकपूर्व जामीन मागण्यासाठी गेलेल्या मॉविन गुदिन्हो यांचे बंधू विल्सन गुदिन्हो यांना सत्र न्यायालयानंतर आता मुंबई उच्च न्यायालयाच्यागोवा खंडपीठानेही जामीन नाकारला आहे. त्याची आव्हान याचिका खंडपीठाने गुरूवारी फेटाळून लावली.
न्या. नूतन सरदेसाई यांच्यापुढे या प्रकरणात सुनावणी सुरू होती. या प्रकरणातील सुनावणी पूर्ण झाली होती व निवाडा राखून ठेवला होता. गुरूवारी या प्रकरणात न्या. सरदेसाई यांनी निवाडा जाहीर करताना गुदीन्होची आव्हान याचिका फेटाळली. त्यामुळे विल्सनपुढे आता दोनच पर्याय राहिला आहे. एक तर अटक चुकविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेणे किंवा या प्रकरणाचा तपास करणाऱ्या क्राईम ब्रँचला शरण जाणे.
प्रकाश नाईक यांचा संशयितरित्या मृत्यू झाला होता. त्याच्या खोलीतच त्याच्या डोक्याला गोळी झाडण्यात आली होती. त्याच्या मोबाईलमधून त्याच्या बहिणीला पाठविण्यात आलेल्या मेसेजमध्ये ते आत्महत्या करत असल्याचे म्हटले होते. तसेच विल्सन गुदिन्हो आणि ताहीर अशा दोन नावांचा उल्लेख करीत त्यांनी त्यांच्यावर आत्महत्येची वेळ आणल्याचे म्हटले होते. त्यामुळे या प्रकरणात कुटुंबियांनी जुने गोवा पोलीस स्थानकात तक्रार नोंदविली होती. जुने गोवा पलिसांनी हे प्रकरण आत्महत्या म्हणून नोंद केले होते, विल्सन गुदिन्हो व ताहीर विरणानी यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्यासाठी गुन्हे नोंदविण्यात आले होते. नंतर हे प्रकरण क्राईम ब्रँचला देण्यात आले.
अटकेची शक्यता लक्षात घेऊन विल्सनने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला होता. सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर विल्सनने खंडपीठात सत्र न्यायालयाच्या निवाड्याला आव्हान दिले होते. प्रकाश नाईक यांची बहीण अक्षया नाईक यांनी त्याला जामीन देण्यासाठी हरकत घेताना हस्तक्षेप याचिका सादर केली होती. ती खंडपीठाने दाखल करून घेतली. या प्रकरणाच्या तपासासाठी विल्सनचा कोठडीतील तपास आवश्यक असल्याचे पोलीसांनी खंडपीठाला सांगितले होते.