- संतोषकुमार गवई
पातूर: राष्ट्रीय महामार्गासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या शेतीच्या दोन कोटी ४० लाख रुपयांच्या मोबदल्याच्या रकमेबाबत झालेल्या वादात चुलतभाऊ आणि काकूने पुतण्याचा खून केल्याची घटना कापशी रोड येथे बुधवारी रात्री उशिरा (१७ मार्च) घडली. या प्रकरणी पातूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली.
फिर्यादी चंदन रामकरण केवट यांनी पातुर पोलिसात दिलेल्या जबानी रिपोर्ट नुसार, आरोपी विशाल मुन्नीलाल केवट (२८,रा. कापशी रोड) चौफुलाबाई मुन्नीलाल केवट (५०) यांच्यामध्ये शेतीबद्दल वाद सुरू होता. सदर प्रकरण दिवाणी न्यायालयात न्यायप्रविष्ट होते. या शेतीपैकी काही शेती महामार्ग चौपदरीकरणासाठी शासनाने घेतली आहे. त्या शेतीचा मोबदला म्हणून दोन कोटी ४० लाख रुपये मंजूर झाले होते. त्यासंदर्भात फिर्यादी व मृतक यांच्यात न्यायालयीन खटला सुरु आहे या कारणावरून बुधवार, १७ मार्च रोजी रात्री दहा वाजता आरोपी विशाल मुन्नीलाल केवट आणि चौफुलाबाई मणिलाल केवट यांनी बंटी रामकरण यादव यास शिवीगाळ करून छातीत मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या बंटी केवट यास नातेवाईकांनी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी पतूर पोलिसांनी गुरुवारी सकाळी खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलीस उपविभागीय अधिकारी दत्तात्रय आव्हाळे पातुरात दाखल झाले आहेत. पोलिस निरीक्षक हरीश गवळी यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक अमोल गोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल भास्कर इंगळे, अरविंद पवार, दिलीप मोडक, निलेश राठोड यांच्या पथकाने आरोपी विशाल मुन्नीलाल केवट चौफुलाबाई मुन्नीलाल केवट यांना अटक केली.