अलिबाग : नोकरीला लावतो सांगून लाख रुपये घेऊनही नोकरीला लावले नाही. याचा राग मनात धरून आपला चुलत भाऊ नथुराम पवार याची हत्या करून फरार झालेल्या दोन पैकी एका आरोपीला अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे. हत्येतील एक आरोपी मात्र अद्यापही फरार आहे. अटक केलेल्या निलेश पवार याला अलिबाग न्यायालयात हजर केले असता २७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अलिबागमधील युनियन बँक मध्ये शिपाई असलेल्या नथुराम रुपसिंग पवार (४०) हा सोमवारी १३ मार्च पासून घरी आला नसल्याने त्याच्या कुटुंबाने अलिबाग पोलीस ठाण्यात मिसिग तक्रार केली होती. मंगळवारी १४ मार्च रोजी अलिबाग तालुक्यातील सहाण पाले बायपास येथील शेतात दुपारच्या सुमारास नथुराम पवार यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह सापडला होता. याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला होता. अलिबाग पोलीस पवार यांच्या खुनाचा तपास करीत होते. संशयित म्हणून दोन आरोपी असल्याचा सुगावा पोलिसांना लागला होता. मात्र आरोपीचा तपास लागत नव्हता. अखेर नथुराम पवार याचा चुलत भाऊ असलेला आरोपी निलेश पवार याला सोलापूर येथून अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे.
मयत नथुराम पवार याने आपल्या चुलत भाऊ निलेश याच्याकडून नोकरीला लावतो असे सांगून लाख रुपये घेतले होते. निलेश याने पैसे देऊनही नथुराम यांने दिलेला शब्द पाळला नव्हता. त्यामुळे आरोपीच्या मनात राग उत्पन्न झाला होता. आरोपी निलेश हा मयताचा चुलत भाऊ असून दुसरा आरोपी हाही नातेवाईक आहे. या दोघांनीही मयत नथुराम याला सहाण पाले येथे घेऊन जाऊन नशापाणी करून कोयत्याने वार करून जिवे ठार मारले आणि पसार झाले.
नथुराम याच्या खून्याचा तपास अलिबाग पोलीस करीत होते. आरोपी निलेश हा फरार असून सोलापूर येथे पोलीस ठाण्यात जाऊन हजर झाला. त्याठिकाणी त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. सोलापूर पोलिसांनी अलिबाग पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर आरोपीच्या पाळतीवर कर्नाटक मध्ये गेलेले अलिबागच्या पोलिसांनी आरोपी निलेश याला ताब्यात घेऊन अटक केली. आरोपी निलेश याला अलिबाग न्यायलायात हजर केले असता २७ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. फरार असलेल्या दुसऱ्या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.