अलिबाग : अभिषेक राजपूत या महाविद्यालयीन युवकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीला अलिबाग पोलिसांनी सात तासांत गजाआड केले. जितेंद्रसिंग सुमेरसिंग राजपूत (२४) असे आरोपीचे नाव असून, तो अभिषेकचा चुलत भाऊ आहे.बुधवारी अभिषेकला डोक्यात, छातीवर आणि हाताला गंभीर दुखापत केल्याने तो कोमात गेल्याने डॉक्टरांनी त्याला तातडीने मुंबई येथील रुग्णालयात हलवले होते.अभिषेक हा जेएसएम महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्सच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. अभिषेकचे वडील गोविंदसिंग राजपूत, आरोपी जितेंद्रचे वडील सुमेर सिंग राजपूत आणि तिसरे भाऊ आचल सिंग राजपूत यांचे अलिबाग तालुक्यात वावे येथे मिठाईचे दुकान आहे. अभिषेकचे वडील हे परिवारासोबत वावे येथेच राहतात, तर जितेंद्रसिंगचे वडील सुमेर सिंग राजपूत हे परिवारासह अलिबाग-विद्यानगर येथे राहतात.जितेंद्रचे राजस्थानमधील एका मुलीबरोबर प्रेमसंबंध होते. ते लवकरच लग्न करण्याच्या विचारात होते; परंतु अभिषेकचे वडील गोविंदसिंग यांनी जितेंद्र हा चांगला मुलगा नाही, काम धंदा करत नाही, व्यसनी आहे, असे मुलीला सांगितले.काकाने आपल्याबद्दल वाईट सांगितल्यामुळे जितेंद्र चिडला होता. रागाच्या भरात त्याने मित्र चिरंजीव गंडाळे याला सोबत घेऊन अभिषेकला महाविद्यालयातून घेतले. बाइकवरून ते तिघे कुरूळच्या दत्त टेकडी परिसरात गेले. त्यानंतर जितेंद्रने चिरंजीवला बाहेर थांबण्यास सांगितले. जितेंद्र अभिषेकला तेथील एका पडक्या खोलीत घेऊन गेला. अभिषेकला काहीच कल्पना नव्हती की त्याला चुलत भाऊ मारणार आहे. जितेंद्रने तेथेच पडलेल्या बीअरच्या बाटलीने अभिषेकच्या डोक्यावर प्रहार केला. तसेच छातीवर आणि हाताला गंभीर दुखापत केली.अभिषेक ओरडत असताना चिरंजीव तेथे आला. समोर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला अभिषेकला जितेंद्र मारत होता. चिरंजीव सोडवायला गेला त्या वेळी त्याच्या हातालाही दुखापत झाली. जितेंद्रने चिरंजीवला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी अभिषेकला जखमी अवस्थेत जिल्हा सरकारी रुग्णालयात आणले.सीसीटीव्हीमुळे तपासाला गतीआरोपीला पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते. घटनास्थळाच्या काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले होते. त्याच्या मदतीने पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले. दरम्यानच्या कालावधीत जितेंद्र मामाकडे, मुंबईला गेला होता.पोलिसांनी चिरंजीवला विश्वासात घेऊन घटना जाणून घेतली. त्यानंतर जितेंद्रच्या घरच्यांनाही विश्वासात घेतले. काहीच घडले नसल्याचे घरच्यांकरवी सांगून त्याला परत अलिबागला बोलावले. अलिबागच्या स्टॅण्डवर आल्यावर पोलिसांनी जितेंद्रला अटक केल्याचे अलिबागचे पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी सांगितले.
चुलत भावावर प्राणघातक हल्ला, आरोपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 3:31 AM