वसई : वसई- विरार महानगरपालिकेच्या विरार येथील वॉर्ड क्रमांक २५ च्या नगरसेविका मीनल पाटील यांनी फुल विक्रेता असणा-या स्वत:च्या चुलत सास-याला शिवीगाळ व मारहाण केल्याच्या तक्रारीवरून नगरसेविकेसह त्यांच्या कुटुंबातील अन्य १५ ते २० जणांविरुद्ध विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.मात्र हा आरोप धादांत खोटा असून ही जागा आमच्या मालकीची असून, सहा महिन्यांपूर्वीच्या बाचाबाचीचा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने व्हायरल करून तक्र ार दाखल केल्याचा आरोप नगरसेविका मीनल पाटील यांनी केला आहे.विरार पश्चिम येथील पाटील वाडी परिसरात राहणारे हरेश्वर पाटील हे फुल विक्र ीचा व्यवसाय करतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, दमयंती आणि दोन मुले स्वप्निल व रोहन सोबत त्यांच्या वडिलोपार्जीत जागेतील एका घरात राहत असून महानगरपालिकेच्या नगरसेविका मीनल रमाकांत पाटील यांचे सासरे कमलाकर पाटील यांचा सुद्धा त्यावर हक्क आहे. त्यांचे काही दिवसा पूर्वीच निधन झाले. त्या पूर्वीच कमलाकर पाटील यांनी या जागेतील काही हिस्सा हरेश्वर पाटील यांना दिला होता, असे हरेश्वर पाटील यांनी सांगितले. या जागेत ते कुटुंबीयांसह राहत असतांना नगरसेविकेने दमदाटी, शिवीगाळ केली. हि जागा बाळकावण्याकरिता हरेश्वर पाटील व त्यांच्या कुटुंबाला त्या अतोनात त्रास देत असल्याचा आरोप करून विरार पोलिस ठाण्यात नगरसेविकासह १५ ते २० लोकांविरूध्द तक्रार दाखल केली आहे. नगरसेविकेने पाटील यांच्या यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान केलं असून काही दिवसांपासून त्यांच्या घराचे पाणी वीज पुरवठा बंद करण्यात आला होता. असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. याबाबत नगरसेविका मिनल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, मारहाण व दमदाटी घडले नसल्याचे सांगितले.
चुलत सासऱ्याचा छळ; नगरसेविकेविरुद्ध तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:10 AM