केरळ - दक्षिण भारतातील केरळच्या भाजप प्रदेशाध्यक्षांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय. सीपीएम (एम) महिला नेत्यावर वादग्रस्त टिपण्णी केल्याप्रकरणी केरळ पोलिसांनी प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांच्याविरुद्ध आयपीसी ३५४ ए आणि ५०९ अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी, सीपीएमच्या महिला नेत्या सुजाता यांनी स्वत: फिर्याद दिली होती.
महिलांसंदर्भात अपशब्द वापरुन भाषणात महिलांबद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी सुरेंद्रन यांच्याविरुद्ध वरील दोन्ही कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती केरळ पोलिसांनी दिली. सी.एस. सुजाता ह्या अखिल भारतीय लोकतांत्रिक महिला संघाच्या सचिव आहेत. त्यांनीच भाजप नेते सुरेंद्रन यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली होती. सुरेंद्रन यांनी त्रिशुर येथील सभेत बोलताना हे वादग्रस्त विधान केलं होतं. त्यामुळे, हे प्रकरण तेथील पोलीस ठाण्यातच वर्ग करण्यात येणार असल्याचे समजते.
काय म्हणाले होते सुरेंद्रन
एका कार्यक्रमातील भाषणात बोलताना भाजप नेते सुरेंद्रन यांनी म्हटले होती की, सीपीएम (एम) च्या महिला नेता महिला सशक्तीकरणाच्या गोष्टी करुन सत्तेत आल्या, पण जनतेचा पैसा खावून त्या मोठ्या (जाड) झाल्या आहेत. सीपीएमच्या महिला नेत्या आता, राक्षसीन पुतणाप्रमाणे दिसत आहेत, असं वादग्रस्त विधान सुरेंद्रन यांनी केलं होतं.
माफी मागा, मुख्यमंत्री गप्प का?
केरळमध्ये या प्रकरणावरुन आता चांगलच राजकारण सुरू असल्याचं दिसून येतंय. काँग्रेसचे वरिष्ठ नेते वी.डी. सतिशन यांनी सुरेंद्रन यांच्याकडे सीपीएमच्या महिला नेत्याची माफी मागावी, अशी मागणी केलीय. सुरेंद्रन यांनी केवळ एकाच नाही, तर सर्वच महिलांचा अपमान केलाय. त्यामुळे, त्यांनी माफी मागायला हवी, असे सतिशन यांनी म्हटलंय. तसेच, याप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री पिनराई विजय हे गप्प का आहेत? असा सवालही त्यांनी विचारलाय.