लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नातेवाईकांना भेटून आपल्या घराकडे निघालेल्या मायलेकाच्या दुचाकीला क्रेनची धडक बसल्यामुळे दोघांचाही करुण अंत झाला.
रविवारी रात्री हा भीषण अपघात लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला. कुसुम दिलीप बसेना (वय ४७) आणि ललित दिलीप बसेना (वय १८) अशी मृत माय-लेकाची नावे आहेत. लकडगंजच्या चणा आळीत राहणारे बसेना मायलेक रविवारी सायंकाळी आपल्या नातेवाईकाच्या घरी गेले होते. तेथून रात्री ९.१५ च्या सुमारास ते आपल्या घराकडे दुचाकीने निघाले. दुचाकी ललित चालवत होता.
लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डीसीपी झोन ऑफिस, रेल्वे क्रॉसिंग जवळ क्रेनला ओव्हरटेक करून समोर येताच ललितच्या दुचाकीला क्रेनची धडक बसली. त्यामुळे मायलेकांचा करुण अंत झाला. ज्या ठिकाणी हा भीषण अपघात झाला, तेथे बांधकाम सुरू असल्याने साहित्य अस्ताव्यस्त पडले आहे. त्यामुळे वाहतुकीला अडसर ठरला असून छोटे-मोठे अपघात त्या ठिकाणी नेहमीच घडतात संबंधित अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष आहे, असा आरोप करून जमाव संतप्त झाला. त्यामुळे घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले.
माहिती कळताच लकडगंजचे ठाणेदार पराग पोटे आपल्या ताफासह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह रुग्णालयात पाठवले. अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला करून वाहतुक सुरळीत केली. महेंद्र देवनाथ वर्मा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी क्रेन (केए ३५ / बी १४६५)च्या आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. सूत्रांच्या माहितीनुसार, या कुटुंबातील प्रमुख दिलीप बसेना यांचे दोन वर्षांपूर्वीच निधन झाले. त्यामुळे कुसुम आणि ललित यांच्यावर कुटुंबाचा भार होता. आता मायलेकाचा अपघाती मृत्यू झाल्याने त्यांच्या शेजाऱ्यांत तीव्र शोककळा पसरली आहे.