मुंबई : वाइल्ड लाइफ वेल्फेअर असोसिएशन (डब्ल्यूडब्ल्यूए), स्प्रेडिंग अवेअरनेस आॅन रिप्टाइल्स अँड रिहॅबिलिशन प्रोग्राम (सर्प), वाइल्ड लाइफ क्राइम कंट्रोल ब्युरो (डब्ल्यूसीसीबी) आणि वनविभागाचे शिकार-विरोधी पथक यांनी मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट येथे शुक्रवारी तस्करीसाठी आणलेले कासव आणि पहाडी पोपट (रोज रिंग पॅराकिट्स) यांची सुटका केली. आरोपी बिलाल मोहम्मद हानिफ शेख (२९) याच्याकडून २० कासवे आणि एक पोपट जप्त करण्यात आले. आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.इंडियन रूफ टर्टल (कासव) हे वन्यजीव संरक्षण कायदाच्या शेड्यूल एकमध्ये आहे. त्यामुळे त्याची तस्करी करणे गुन्हा आहे़ बाजारामध्ये कासवांची व पोपटांची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती वनविभाग आणि संस्थांना मिळाली होती. आरोपीच्या मोबाइलमध्ये कासव, पोपट यांचे व्हिडीओ सापडले आहेत़ यातून आणखी तस्करीचे धागेदोरे सापडू शकतात़ यासाठी त्याचा मोबाइल ताब्यात घेण्यात आला आहे. एक पोपट आरोपीच्या घरातून जप्त केला. आरोपीवर या आधीही पशू-पक्ष्यांची तस्करी करताना कारवाई झालेली आहे. वनअधिकारी युवराज गीते, वाइल्ड लाइफ क्राइम कंट्रोल ब्युरोचे विजय नंदेश्वर व ललित पवार, डब्ल्यूडब्ल्यूएचे ओंकार कोलेकर, निखिल महाजन, स्वप्निल वीर, आदित्य पाटील आणि सर्प संस्थेचे अरबाज खान, अकबर शेख, अनुज खानविलकर व कुणाल हबडे व पॉज (मुंबई) या प्राणिमित्र संस्थांनी कारवाई केली.
क्रॉफर्ड मार्केट : तस्करीसाठी आणलेल्या एक पोपट आणि २० कासवांची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 4:01 AM