कल्याण - येथील पश्चिमेकडील मुरबाड रोडवरील ताल बारमध्ये पार्टी करण्यासाठी आलेल्या सहा जणांनी बार सुरू ठेवण्यासाठी धिंगाणा घालत मॅनेजर आणि बार मालकाला दमदाटी केल्याची घटना सोमवारी रात्री 9 वाजता घडली. याप्रकरणी सहा जणांना महात्मा फुले चौक पोलिसांनीअटक केली असून आरोपींमध्ये एका पोलिस कर्मचाऱ्याचा समावेश आहे.
मंगलसिंघ भवरसिंघ चौहान (वय 30), रिकीन केतन गज्जार (वय 25), उत्तम लक्ष्मण घोडे (वय 31), हरीश्याम कन्हैया सिंग (वय 48), विक्रांत एकनाथ बेलेकर (वय 26) आणि शेखर गणपत सरनौबत (वय 28) अशी सहा अटक आरोपींची नावे आहेत. यातील उत्तम घोडे हे ठाणो ग्रामीण पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी आहेत. हे सहा जण सोमवारी रात्री साडेआठ वाजता ताल बारमध्ये दारू पिण्यासाठी गेले होते. त्या सर्वाचे दारू आणि जेवणाचे असे मिळून त्यांचे बील 16 हजार 320 इतके झाले होते. बिल आले असता एकाने धमकाविण्यासाठी त्याच्या जवळील रिव्हॉल्वर टेबलावर काढून ठेवले त्यात बार बंद करण्याची वेळ आल्याने तेथील मॅनेजर राजकिरण जाधव यांनी माईकवरून तशी घोषणा केली. याचा राग सहा जणांना आला. अटक आरोपींना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
आरडाओरड करीत बार सुरू ठेवण्याची तसेच गाणे सुरू करण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली. यावेळी त्यांचा मॅनेजर आणि कर्मचा-यांशी वाद देखील झाला. बार नेहमीप्रमाणो सव्वानऊच्या सुमारास बंद करण्यात आला. सहाजण बारबाहेर पडले असता त्यांच्याकडे बील भरण्यासाठी पुरेसे पैसे देखील नव्हते. बारच्या बाहेर या मुद्यावरून देखील वाद झाला. यात मॅनेजर राजकिरण, बारमालक द्वारेश गौडा आणि अन्य एकाला शिवीगाळ करीत धक्काबुक्की करण्यात आली. आम्ही पैसे आणून देतो परंतू बार चालू कर नाहीतर बील देणार नाही अशीही दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी देखील दिली. याची माहीती महात्मा फुले चौक पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत धिंगाणा घालणा-या सहा जणांना अटक केली. आरोपींमध्ये एकजण एका माजी नगरसेवकाचा नातेवाईक असल्याचीही माहिती मिळत आहे.