नागपूर : कार घ्यावी असे कुणाला वाटत नाही. महागड्या कारमध्ये फिरण्याची प्रत्येकाची हौस असते. परंतु ही हौस एका आरोपीने घरफोड्या करून पूर्ण केली. घरफोड्या करून मिळालेल्या रक्कमेतून त्याने चक्क क्रेटा कार खरेदी केली. परंतु गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाने त्याला गजाआड करून खरेदी केलेली क्रेटा कार जप्त केली आहे.
संदिप खेमचंद्र टेंभरे (२४, रा. हुंडा, शिवनी मध्यप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. २८ डिसेंबर २०२३ रोजी प्रियंका आशिष जांगडे (३१, रा. थ्री स्टार हाऊसिंग सोसायटी, चेतन्येश्वरनगर, वाठोडा) या आपल्या घराला कुलुप लाऊन कुटुंबासह बाहेरगावी गेल्या होत्या. अज्ञात आरोपीने त्यांच्या घराचे कुलुप तोडून घरातील लोखंडी आलमारीतील सोन्याचे दागीने किंमत ४.२३ लाख चोरी केले होते. त्यांच्या तक्रारीवरून वाठोडा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याच्या समांतर तपासात गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरून सापळा रचून आरोपी संदिपला ताब्यात घेतले असता त्याने घरफोडीची कबुली दिली. तसेच वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत १ जानेवारी २०२४ रोजी संजय महादेव नाकाडे (४४, रा. जिजामातानगर) यांच्याकडे व हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी केल्याची कबुली दिली.
आरोपीने चोरी केलेले सोन्याचे दागीने आरोपी ओम शर्मा (रा. शिवाजीनगर गंगाबाई घाट) याच्या मार्फत आरोपी तुषार कावडे (रा. लालगंज शांतीनगर) याला विक्री केल्याचे सांगितले. दागीने विकून मिळालेल्या रक्कमेतून होंडा कंपनीची क्रेटा कार क्रमांक एम. एच. ३१, ई. यु-७३६८ किंमत ६.५० लाख खरेदी केल्याचे आरोपी संदिपने सांगितले. त्याच्या ताब्यातून क्रेटा कार जप्त करण्यात आली. गुन्ह्यात त्याला मदत करणारे आरोपी ओम, आणि तुषार यांचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे.