पिंपरी : कंपनीने खर्चासाठी दिलेल्या पैशांच्या नोंदी न ठेवता पावणेनऊ लाखांची अफरातफर केली. १ जानेवारी ते ३० मार्च २०१९ दरम्यान हा प्रकार घडला.चऱ्होलीतील वडमुखवाडीतील कंपनीच्या दोन अकाऊंटंट विरोधात तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन दिलीप जाधव (रा. येरवडा) व प्रदीप बाबासो सुतार (रा. कोल्हापूर) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी कंपनीचे सिक्युरिटी अॅडमिन बाबासाहेब ज्ञानदेव फराकटे (वय ५८, रा. पवारवस्ती, लोहगाव) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी नितीन जाधव आणि प्रदीप सुतार हे दोघेही चऱ्होलीतील वडमुखवाडी येथील कृष्णाई इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे अकाऊंटंट आहेत. कंपनीने वेळोवेळी खर्चासाठी दिलेल्या पैशांचा कंपनीच्या नियमाप्रमाणे खर्च करून त्याच्या नोंदी ठेवणे आवश्यक होते. मात्र आरोपी नितीन जाधव व प्रदीप सुतार यांनी त्या पैशांच्या नोंदी न ठेवता ८ लाख ८५ हजार ५२४ रुपयांची अफरातफर केली. त्या पैशांचा स्वत:च्या फायद्यासाठी वापर करून कंपनीची फसवणूक केली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.
कंपनीत पावणेनऊ लाखांची अफरातफर केल्याप्रकरणी दोन अकाऊंटंटवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 8:25 PM