- देवेंद्र पाठक
धुळे : घरात कोणीही नसल्याची संधी साधून एका अपंग तरुणीवर तिच्या शेजारी राहणाऱ्या एकाने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना २४ फेब्रुवारी रोजी सकाळी घडली. संशयिताविरोधात साक्री पोलिस ठाण्यात पीडितेच्या आईने शुक्रवारी फिर्याद दाखल केली. साक्री तालुक्यातील एका गावात एक परिवार वास्तव्यास आहे. त्या परिवाराला एक ३० वर्षांची मुलगी असून ती कर्णबधिर व मूकबधिर आहे. काही कामानिमित्त हा परिवार कुठे बाहेर गेल्यामुळे ही तरुणी घरात एकटीच होती. घरात कोणीही नसल्याची संधी साधून गल्लीतच घराशेजारी राहणाऱ्या एकाने हा फायदा उचलला.
तो घरात शिरला आणि दार बंद करून तिच्याशी बळजबरी करू लागला. तिच्यावर त्याने बळजबरीने अत्याचारही केला. ही घटना २४ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. अत्याचार केल्यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला. घरातील सदस्य परतल्यानंतर त्यांना ही बाब समजली. अपंग असलेल्या मुलीकडून आपबिती कथन केल्यानंतर याप्रकरणी साक्री पोलिस ठाणे गाठत पीडित तरुणीच्या आईने गुरुवारी फिर्याद दाखल केली. त्यानुसार भादंवि कलम ३७६ (२) (१) सह अपंग व्यक्ती अधिनियम २०१६ चे क्रमांक १२ (ब) १२ (५) प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तपास पाेलिस उपनिरीक्षक आर. व्ही. निकम करीत आहेत.