पिंपरी : एका तरुणाच्या खून प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल केला आहे. त्या प्रकरणावरून एका तरुणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात १८ जणांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे सोशल मीडियावर वेगवेगळ्या नावांनी युझर आयडी आहेत. याबाबत २४ वर्षीय तरूणीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. काही दिवसांपूर्वी सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाची घटना घडली होती. या गुन्ह्याशी संबंधित असलेल्या एका तरुणीचे फोटो आणि जातीय तणाव निर्माण होईल, अशा पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर करीत आहेत.
कोणीही सोशल मीडियातून एखाद्याची बदनामी होईल, असे मेसेज टाकू नये. धार्मिक तसेच जातीय तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्य किंवा व्हिडिओ टाकू नये. सोशल मीडियावर पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या सायबर सेलची नजर आहे. अशा प्रकारची पोस्ट फेसबुक, व्हॉटस अप, टिकटॉक, इन्स्टाग्राम, ट्विटर किंवा इतर कोणत्याही ठिकाणी आढळून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी दिला आहे.