मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या महाजन कोविड उपचार केंद्रात घुसून डॉक्टरांना शिवीगाळ , धमक्या देऊन गोंधळ घालणाऱ्या एका युट्यूबवर चॅनल चालवणाऱ्यासह ८ जणांविरुद्ध तब्बल २५ कलमांखाली नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महापालीकेने भाईंदर पूर्वेच्या इंद्रलोक वसाहतीमध्ये कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रमोद महाजन सभागृहात कोविड उपचार केंद्र सुरु केलेले आहे . ह्या ठिकाणी २०६ खाटा असून सध्या रुग्ण संख्या मोठी असल्याने सदर उपचार केंद्र हे पूर्णपणे भरलेले आहे . खाटा रिकामी नसल्याने रुग्णास अन्यत्र न्यावे लागते.
बुधवारी रात्री ८ च्या सुमारास युट्युब वर चॅनल चालवणारा आफताब खान हा इम्तियाज खान व अन्य ६ ते ७ लोकांसह बळजबरी रुग्णवाहिकेसह कोरोना उपचार केंद्राच्या आवारात शिरला . रुग्णवाहिकेतील रुग्णाची त्यावेळी कर्तव्यावर असलेले डॉ. गौतम टाकळगावकर , डॉ. जय छटपार व डॉ . नितीन जाधव आदींनी तपासणी सुरु केली . रुग्णाचा दाखल करण्या आधीच मृत्यू झाला होता . तपासणीवेळी आफताब सह सोबतच्या लोकांनी आरडा ओरडा चालवला.
आफताबने तर डॉक्टरांना अर्वाच्च शिवीगाळ व दमदाट्या चालवल्या. उपचार केंद्रात आणि डॉक्टरांच्या कार्यालयात घुसून आफताब व त्याच्या साथीदारांनी गोंधळ घातला. मास्क सुद्धा त्यांनी घातले नव्हते . डॉक्टरांच्या कामात अडथळा आणला . आदी प्रकरणी डॉ. टाकळगावकर फिर्यादी वरून नघर पोलीस ठाण्यात विविध कायदे नियमातील तब्बल २५ कलामांखाली आफताब व त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.