बारामती : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत अपशब्द वापरल्याबद्दल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भा.द.वि.क ५०५ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असुन याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष अमर धुमाळ यांनी तक्रार दिली आहे.तसेच, पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्याकडे निवेदन दिले आहे.
त्याुनसार भाजपा आमदार पडळकर यांनी ज्येष्ठ नेते पवार यांच्या बद्दल अत्यंत खालच्या भाषेमध्ये अपशब्द उच्चारून टिका केली आहे. ज्येष्ठ नेते पवार गेली ५५ वर्षे देशाच्या व राज्याच्या राजकारणात सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रिडा, साहित्यीक, आरोग्य विषयक, कृषी, सहकार, पशुसंवर्धन,औद्योगिक क्षेत्रांतील प्रश्न सोडविण्याचे व आपत्याकालीन परिस्थितीमध्ये मार्ग काढण्याचे काम केले आहे. अशा नेतृत्वावर प्रसिध्दी मिळवण्यासाठी काल पडळकर यांनी टीका केली आहे. बारामती तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व तमाम बारामतीकरांचे वतीने जाहिर निषेध करण्यात आला आहे.तसेच, पडळकर यांचेवर कायदेशीर कारवाई व्हावी ,अशी मागणी करण्यात आली आहे.तसेच भविष्यात असे कोणी कृत्य केल्यास त्यास जोरदार उत्तर देवुन आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर,माळेगांव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे,संचालक योगेश जगताप,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते,नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे,नगरपरिषद गटनेते सचिन सातव,सभापती प्रदीप धापटे, इम्तीयाज शिकीलकर,नगरसेवक नवनाथबल्लाळ,सुनील बनसोडे ,वनिता बनकर,अनिता गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.
———————————