मडगाव - मूळ उत्तर प्रदेश राज्यातील सादिया खातून या विवाहित महिलेल्या मृत्यू प्रकरणात गोव्यातील मडगाव पोलिसांनी एकूण पाच जणांवर गुन्हा नोंद केला आहे. मयताचे सासू आणि सासरे तसेच अन्य तिघांवर पोलिसांनी भारतीय दंड संहितेंच्या 498 (अ) व 306 कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आशिष परब पुढील तपास करीत आहे. सादिया हिचा मडगावातील घोगळ हाउसिंग बोर्ड येथील मोहम्मद मेहराजुददीन शिग्गांव याच्याशी निकाह झाला होता.
खैरुनिस्सा खान व उस्मान खान या मयताच्या सासू व अन सासरे आहेत. लहानसहान कारणांवरुन सादिया याचा छळ करीत असल्याबददल त्यांच्यावर गुन्हा नोंद केला असून, मयताच्या आत्महत्येला जबाबदार असल्याप्रकरणी अतिक बंदुका, अहमद खादर व सलीम शेख या अन्य तिघांवर गुन्हा नोंद केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मयताचे वडील जमाल अहमद (७५) हे या प्रकरणातील तक्रारदार आहेत. ७ ऑगस्ट २०१७ रोजी आत्महत्येची ही घटना घडली होती. मोहम्मद हे मूळ कर्नाटकातील असून, सांस्कृतिक मतभेदामुळे सादियाचा छळ केला जात होता. तिचे वडील जमाल अहमद हे समेट घडविण्यासाठी मडगावात आले होते. येथील एका हॉटेलात समेटबद्दल बोलणीही चालू होती. मात्र ती यशस्वी झाली नाही. सादियाने त्याच हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरुन खाली उडी मारली होती. त्यात ती गंभीर जखमी झाल्याने नंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. मागाहून तिचे निधन झाले होते.
विवाहाच्या सात वर्षाच्या आत मृत्यूची ही घटना घडल्याने उपदंडाधिकाऱ्यामार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात आली होती. या मृत्यू प्रकरणात घातपत असावा असा संशय असल्याने या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचा आदेश सासष्टीचे उपदंडाधिकारी उदय प्रभूदेसाई यांनी मडगाव पोलिसांना दिला होता. सोमवारी मडगाव मुस्लिम असोसिएशनने पत्रकार परिषद घेतली होती. यात मयताचे वडील जमाल अहमद यांनी आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी केली होती. मडगाव पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून हे प्रकरण नोंदवून घेतले होते.चौकशी दरम्यान या मृत्यूप्रकरणात घातपाताचा संशय नाकारता येत नसल्याच्या निष्र्कषापर्यंत चौकशी करणारी यंत्रणा येउन पोहचली होती. शवचिकित्सा अहवालात डोके व मणक्याला इजा पोहचल्यामुळे मृत्यू आल्याचे स्पष्ट झाले होते.