सातारा : सुरूर ता. वाई येथील धावजी पाटील मंदिरात एका स्वयंघोषित मंत्रिकाकडून भूत उतरवण्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. या प्रकारानंतर भुर्इंज पोलिसांनी तातडीने मांत्रिकासह चौघांवर जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. याबाबत भुईंज पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुरूर येथील धावजी पाटील मंदिरात गेल्या अनेक वर्षांपासून स्वयंघोषित मांत्रिकाकडून भूत उतरवण्याचे प्रकार सुरू होते.
यापूर्वीही संबंधित मांत्रिकाबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याच्यावर कारवाई सुद्धा झाली आहे. मात्र, अद्यापही भूत उतरवण्याचे प्रकार त्याच्याकडून सुरूच होते. ॲड. मनोज माने हे धावजी मंदिरात मंगळवारी दुपारी दर्शन घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी स्वयंघोषित मांत्रिक मंदिरामध्ये एकाच्या अंगातून भूत उतरवण्याचा प्रकार करत होता. यावेळी तो शिवीगाळ, मारहाण करून दहशतीचे वातावरण निर्माण करत होता.
अॅड. माने यांनी याचे मोबाइलमध्ये चित्रीकरण करून भुईंज पोलीस ठाण्यात दिले. त्यानंतर पोलिसांनी मुख्य मांत्रिकासह चौघांवर जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. संबंधित मांत्रिकाचे नाव पोलिसांना समजू शकले नसून, गुन्हा दाखल होताच मांत्रिक तेथून पसार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकारानंतर अंनिसचे राज्य कार्यकारी समितीचे सदस्य डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले, सुरूर येथील धावजी पाटील मंदिरात गेल्या अनेक दिवसांपासून स्वयंघोषित मांत्रिकाकडून अशा प्रकारचे अघोरी कृत्य सुरू आहे. याला कायमचा आळा बसविणे गरजेचे आहे.