लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: अंडर ग्रांऊड केबल टाकण्याची मशीन खरेदीसाठीची रक्कम संबंधितांच्या बँकेत भरल्यानंतरही मशीन न पाठविता, अदा केलेली रक्कम टाळाटाळ करीत असलेल्या चौघांविरोधात शहर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. एटीएम अपहार प्रकरणाची शाई वाळते ना वाळते तोच, शहरात आणखी एक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. खामगाव शहरातील कोल्हटकर स्मारक मंदिरानजीक राहणाºया आकाश विठ्ठल सातपुतळे (३६) यांनी वर्ड वाईड मशिनरीज् सोल्युशन मुंबई यांच्याशी भूमिगत केबल टाकण्यासाठी उपयोगात येणाºया मशीन बाबत विचारणा केली. त्यानंतर कंपनीचे व्यवस्थापक नवनीत माथूर, तारीक सलमान, प्रदीप जैन, चैतन्य वैद्य यांच्याशी संपर्क केला असता ४७ लाख ४९ हजार रुपये संबंधित मशीनचे कोटेशन ठरले. सौदा पक्का झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे ही मशीन खरेदी करण्यासाठी सातपुतळे यांनी १५ फेब्रुवारी २०१७ ते २० जून २०१७ या कालावधीत सातपुतळे यांनी २३ लाख ९७ हजार वर्ड वाईड कंपनीच्या एचडीएफसी बँकेतील खात्यात जमा केले. मात्र, या कंपनीकडून कोणतीही मशीन पाठविण्यात आली नाही. त्यामुळे पैसे परत करण्यासाठी सातपुतळे यांनी तगादा लावला असता, संबंधीतांनी ९ लाख रूपये परत केले. उर्वरीत १४ लाख रुपयांची रक्कम परत मिळविण्यासाठी सातपुतळे यांनी बरेच प्रयत्न केले. वारंवार संपर्कही केला. मात्र, संबंधितांनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्यामुळे सातपुतळे यांनी कंपनीच्या व्यवस्थापकांसह चौघांविरोधात खामगाव शहर पोलिस स्टेशनला मंगळवारी रात्री तक्रार दाखल केली. यातक्रारीवरून शहर पोलिसांनी वर्ल्ड वाईड मशीनरीज सोल्युशन मुंबईच्या व्यवस्थापकांसह उपरोक्त चौघांविरोधात कलम ४२०, ४०६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला.