लातूर : तक्रारदाराच्या गावातील जुन्या बोअरवेलमध्ये बसविलेल्या नवीन पाच इलेक्ट्रिकल मोटारींच्या बिलाची मोजपुस्तिका करण्यासाठी ४० हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेलातूर जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी विभागातील शाखा अभियंत्यावर गुन्हा नोंद केला आहे.
तक्रारदाराच्या गावातील जुन्या बोअरवेलमध्ये बसविलेल्या नवीन पाच इलेक्ट्रिकल मोटारींच्या बिलाची मोजपुस्तिका व प्रलंबित ७ लाख ४० हजार रुपये बिल मंजूर करण्यासाठी अभियंता ज्ञानदेव प्रल्हादराव सुडे यांनी तक्रारदारास ६० ते ६५ हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार देण्यात आली होती. त्यानुसार २७ जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून लाचेच्या मागणीची पडताळणी केली. या पडताळणीत इलेक्ट्रिकल मोटारीच्या कामाच्या बिलाची मोजपुस्तिका व प्रलंबित ७ लाख ४० हजार रुपये बिल मंजूर करण्यासाठी अभियंता सुडे यांनी लाचेची मागणी केल्याचे निदर्शनास आले. ६० ते ६५ हजारांची मागणी करण्यात आली होती. तडजोडीअंती ४० हजार रुपये ठरले होते. तडजोडीनुसार ठरलेली रक्कम देण्याकरिता तक्रारदार गेले असता अभियंता सुडे यांना संशय आल्याने लाच घेण्याचे जाणूनबुजून टाळले. दरम्यान, याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये कलम ७ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक कुमार दराडे करीत आहेत.