मुंबई : दहिसर अशोकवन येथे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या बॅनरवरून शिंदे गट - भाजपच्या स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीप्रकरणी दहिसर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गैर कायद्याची मंडळी जमवून दुखापत केल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवत पोलिस अधिक तपास करत आहेत. पहिला गुन्हा भाजपच्या बिभीषण वारे (४०) यांच्या तक्रारीवरुन १९ मार्च रोजी नोंदवण्यात आला आहे. त्यानुसार, शिंदे गटातील सुनील श्रीहरी मांडवे (४३), अनिल महादेव दबडे (४२), रामेश्वर प्रदीप राठोड (२०), राहुल रमेश कागदुले (२३) व विजय गजानन यादव (४३) यांना अटक करण्यात आली.
हे पाचही जण बोरिवलीतील रहिवासी आहेत. आशिष नायर, नीतेश उत्तेकर ऊर्फ बंटी, सोनू पालडे, मयूर वाघेलाचा शोध सुरू आहे. वारे यांच्या तक्रारीनुसार, शुक्रवारी रात्री अटक आरोपींनी शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या कार्यक्रमाचे बॅनर काढून नवनाथ नावाडकर यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्याने अभिनंदनाचा बॅनर लावल्याच्या रागात वाद घालून हाणामारी केली. वारे यांच्या डोक्याला दुखापत करून डाव्या हाताच्या कॉलर बोनला फॅक्चर केले. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदविला..दुसरा गुन्हा शिंदे गटातील आशिष शशी नायर (३५) यांच्या तक्रारीवरून बिभीषण वारे, नवनाथ नावाडकर, बेचैन पांडे, सचिन भालेराव, अनिल गिंबल, अजिंक्य, सूरज, शंकर यांसह अन्य ८ जणांविरोधात गुन्हा नोंदविला.
शुभेच्छांचा बॅनर लावल्याचा रागशिंदे गटाचे आशिष नायर यांच्यावर कांदिवलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार, प्रकाश सुर्वे यांच्या पक्षाचे डिजिटल बॅनर काढून बिभीषण वारे यांनी भाजपच्या नवनाथ नावाडकर यांनी पक्ष प्रवेश केलेला बॅनर लावला. तो बॅनर काढून प्रकाश सुर्वे यांचा गुढीपाडवा शुभेच्छा असलेला बॅनर लावल्याच्या रागात वारे यांनी लाकडी बांबूने, नवनाथ नावाडकर यांनी लोखंडी रॉडने, अनिल गिंबलने चॉपरने, शंकर व सचिन यांनी दारूच्या बाटलीने त्यांच्यासह त्यांच्या मित्रांना मारहाण केली. डोक्यात रॉड लागल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली.