मीरारोड - इमिटेशन ज्वेलरी बनवणाऱ्या कारखान्यात इलेक्ट्रिक कास्टिंग भट्टीवर १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलास जीवितास धोका होईल अशा कामास जुंपल्या प्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने कारखाना दोघा भागीदार मालकांना ताब्यात घेतले आहे.
भाईंदर पूर्वेच्या फाटक - केबिन क्रॉस मार्गावर कस्तुरी उद्योगमध्ये रोझ क्रिएशन नावाच्या इमिटेशन दागिने बनवण्याच्या कारखाना आहे. पोलीस निरीक्षक समीर अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली उमेश पाटील, केशव शिंदे, किशोर पाटील, चेतनसिंग राजपूत, अश्विनी भिलारे, शीतल जाधव, सम्राट गावडे यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे कारखान्यावर ८ ऑगस्ट रोजी छापा मारला. त्यावेळी कारखान्यात इलेक्ट्रिक कास्टिंग भट्टीवर जीवाला धोकादायक असणारे काम करण्यासाठी १६ वर्षीय बाल कामगार ठेवण्यात आल्याचे आढळून आले.
या प्रकरणी कारखाना मालक श्रीकांत मैती रा . द्वारका पॅलेस, काशीनगर व स्वपन द्वारी रा. जॅक सेलिब्रेटी, इंद्रलोक, भाईंदर पूर्व ह्या दोघांना ताब्यात घेत त्यांच्यावर नवघर पोलीस ठाण्यात बाल न्याय अधिनियम, बाल व किशोरयीन ( प्रतिबंध ) कायदा तसेच भादंवि नुसारगुन्हा दाखल करण्यात आला आहे.