लोकमत न्यूज नेटवर्क,
नालासोपारा (मंगेश कराळे) : ऍक्टिव्हा दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत चोराला गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांनी अटक केली आहे. सदर आरोपीकडून सहा दुचाकी आणि एक मोबाईल असे सात गुन्ह्यांची उकल करून चोरीच्या सहा दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. सदर आरोपीवर यापूर्वी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात १३ गुन्हे दाखल आहेत.
सातीवलीच्या तुंगारेश्वर रोड येथे राहणाऱ्या राकेशकुमार यादव यांची २४ ऑगस्टला माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऍक्टिव्हा दुचाकी चोरीला गेली होती. सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी तपासाला सुरुवात केली. तांत्रिक विश्लेषण आणि माहितीदाराने दिलेल्या माहितीवरून आरोपी अमन शेख (२२) याला गुरुवारी वसई रेल्वे स्टेशनच्या जवळून ताब्यात घेतले. सदर आरोपी हा जोगेश्वरी येथे राहत असून त्याने माणिकपूर येथून दुचाकी चोरून वसई स्टेशन जवळ ठेवली होती. तो घरून रेल्वेने वसईला यायचा व चोरीची दुचाकी घेऊन वसईत फिरायचा. आरोपीची बहीण विरारमध्ये राहायची त्याठिकाणी तो जायचा पण पोलिसांना तो सापडला नाही. आरोपी वापरत असलेला मोबाईलही चोरी केलेला होता. शेवटी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दुचाकी ठेवलेल्या ठिकाणी सापळा रचून त्याला अटक केली आहे. आरोपीकडून माणिकपूर दोन, नालासोपारा एक, भाईंदर एक, आंबोली एक, कांदिवली एक आणि आचोळे एक असे ७ गुन्ह्यांची उकल करून १ लाख ६० हजार रुपये किंमतीच्या सहा दुचाकी हस्तगत केल्या आहेत.
सदर आरोपीला गुरुवारी अटक करून वसई न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सध्या सदर आरोपीचा ताबा माणिकपूर पोलिसांकडे आहे. - शाहूराज रणावरे (पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, युनिट दोन)