गौरी टेंबकर-कलगुटकर, लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई :बोईसर येथे राहणारी एमबीबीएसची विद्यार्थिनी स्वदिच्छा साने (२२) ही बँडस्टँड येथून गायब झाली असून, तिचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे ठाकले आहे. तिचा ठावठिकाणा कळण्यासाठी मुंबई पोलिसांनी आता ‘फूड डिलिव्हरी ॲप’ची मदत घेण्यास सुरुवात केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तिला अशा ॲपवरून सतत जेवण मागविण्याची सवय असल्याने तिच्या मोबाईलवरून या प्रकारे एखाद्या ठिकाणी ‘फूड ऑर्डर’ केले होते का? या दृष्टीने तपास सुरू आहे.
स्वदिच्छा हिचा धाकटा भाऊ संस्कार साने याला दोन दिवसांपूर्वी गुन्हे प्रकटीकरण शाखेने चौकशीसाठी बोलावले होते. त्याची बहीण गायब होण्याच्या आधी नेमके काय घडले, याची माहिती त्याच्याकडून घेतली. ज्यात तिला झोमॅटो आणि स्विगी यांसारख्या फूड डिलिव्हरी ॲपवरून जेवण मागविण्याची सवय होती, असे संस्कारने पोलिसांना सांगितले. त्यानुसार ती बेपत्ता झाल्याच्या काळात तिच्या मोबाईलवरून जेवण मागविले गेले होते का? या अनुषंगाने आता तपास सुरू आहे. ती ज्या मिथू सिंह नावाच्या जीवरक्षकासोबत शेवटची पाहिली गेली, त्याने त्याच्या फूड स्टॉलमधून तिला जेवण दिले होते. त्यावेळी ‘इट्स नॉट लुक हायजीन’ असे उत्तर तिने सिंहला दिले होते. पोलीस तिचे मोबाईल लोकेशन तपासत आहेत.