- मनीषा म्हात्रे (वरिष्ठ वार्ताहर)
ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे अभिनेत्री व भाजप नेत्या सोनाली फोगट यांना आपला जीव गमवावा लागल्याचे तपासात समोर येताच ड्रग्जच्या वाढत्या विळख्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. दुसरीकडे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मायानगरीलाही ड्रग्जची वाळवी पोखरत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. मुंबई पोलिसांकडून जप्त होणाऱ्या हजारो कोटी रुपयांच्या ड्रग्ज कारवाईतून याचा विळखा वेळोवेळी उघडकीस येत आहे. मुंबई पोलिसांनी नुकत्याच केलेल्या कारवाईत सोशल मीडियाआड सुरू असलेल्या ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश केला आहे. ऑरगॅनिक रसायनशास्त्रातील पदवीधर आणि दोन कंपन्यांचा सीईओ राहिलेला एमडी तस्करीचा मास्टरमाइंड प्रेमप्रकाश सिंग (५२) याच्याकडून आतापर्यंत दोन हजार कोटींचे ड्रग्ज जप्त केले आहे. मायानगरी मुंबईतील एकेकाळी स्टेटस सिम्बॉल असलेली महागडी विदेशी दारू, सिगारेट यांच्या क्रेझची जागा हळूहळू अमली पदार्थांनी घेतली आहे.
‘डार्क वेब’मुळे एका क्लिकवर... पारंपरिक स्वरूपात पिकवल्या जाणाऱ्या गांजाचे स्वरूप बदलत जाऊन हाइड्रोपोनिक गांजाची मागणी वाढत आहे. यातही उच्चभ्रू मंडळींबरोबर कॉलेजची तरुणाई अडकताना दिसत आहे. कोरोनामुळे तरुणाईचा सोशल मीडियावर वावर वाढला. चार भिंतीआड कैद झाल्यामुळे सतत ऑनलाइन असलेली तरुणाई डार्कवेबभोवती गर्दी करू लागली. लॉकडाऊनमुळे मुंबईतील विविध पार्ट्यांआड सुरू असलेल्या ड्रग्ज पार्ट्यांनाही ब्रेक लागला होता. जिथे लॉकडाऊनच्या काळात सर्व बंद होते, तिथेच या मंडळींना डार्क वेबमुळे एका क्लिकवर घरपोहोच ड्रग्जचा पुरवठा होत आहे. तेही हव्या तशा स्वरूपात. डार्कवेबमुळे तरुणाईला थ्रीलबरोबरच काहीतरी नवीन अनुभवायला, करायला मिळते म्हणून या मंडळींची या भोवती वाढणारी गर्दी चिंताजनक ठरत आहे.
दुसरीकडे मुंबईतून खेडोपाड्यात ड्रग्ज पोहोचत असल्याचेही उघड झाले होते. सध्या याविरोधातच मुंबई पोलिसांकडून ड्रग्जमुक्त शहराचा विडा उचलत कारवाईबरोबरच जनजागृती करण्यावर भर देण्यात येत आहे.
दीड वर्षात ५ हजार किलो ड्रग्ज जप्तमुंबई पोलिसांनी जानेवारी २०२१ ते जून २०२२ या गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत १२ हजार ५६१ गुन्हे दाखल करून तब्बल २१४ कोटी ६९ लाख रुपये किमतीचे ५ हजार किलोचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी १३ हजार १७८ आरोपींना अटक केली आहे. यात सर्वाधिक कारवाई मुख्यत्वे एमडी ड्रग्जशी संबंधित आहे.
दक्षिण मुंबई, मध्य मुंबई आणि पश्चिम उपनगरांतील कुलाबा, फोर्ट, गिरगाव, मरिन लाइन्स, डोंगरी, वरळी, दादर, माहीम, वांद्रे, खार, जुहू, सांताक्रुझ, अंधेरी, ओशिवरा, मालाड, मढ, मार्वे, गोराई अशा उच्चभ्रू वस्तीत असलेले पब, हुक्का पार्लर, रेस्टॉरंट आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये स्टेटस सिम्बॉल म्हणून जात असलेल्या तरुणाईला ड्रग्जची लागण लागली आहे.