मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या काशीमीरा भागातील उद्यान व रस्त्यासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर पुन्हा अतिक्रमण करून बेकायदेशीर ताबा घेतला म्हणून पालिकेने १६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे .
ग्रीन व्हिलेज , जयनगर भागात महापालिकेचे उद्यानासाठी ३६४ क्रमांकाचे आरक्षण असून लागूनच रस्त्याचे आरक्षण आहे . सदर जागेवर शेकडो अतिक्रमण असताना देखील महापालिकेने विकासका सोबत करारनामा करत ती जमीन सातबारा नोंदी पालिकेच्या नावे करून घेतली होती . परंतु टीडीआर देण्याचा प्रश्न असल्याने महापालिकेनेच मोठ्या बंदोबस्तात कारवाई केली होती . परंतु कोरोना संसर्ग काळ आणि पावसाळ्यात पालिकेने शेकडो लोकांना बिल्डरला टीडीआर देण्यासाठी व स्वतःची चूक झाकण्यासाठी बेघर केल्याने पालिका आणि सत्ताधारी भाजपावर टीकेची झोड उठली होती .
त्यातच पालिकेची आरक्षणाची जागा असताना येथील बेकायदा चाळींना पालिकेने मालमत्ता कर आकारणी , पाणी पुरवठा आदी सुविधा तसेच वीज पुरवठा कसा मिळाला ? असे सवाल उभे केले गेले . भाईंदरच्या जय बजरंग नगर मधील एका शौचालया वरून माणुसकीचे ढोल बडवणाऱ्या सत्ताधारी भाजपाचे पदाधिकारी याना काशीमीरा मध्ये मात्र लोकांचे संसार उध्वस्त करून त्यांना रस्त्यावर आणताना माणुसकी दिसली नाही का ? अशी टीका विविध राजकीय पक्ष व सामाजिक संस्थांनी केली.
दरम्यान महापालिकेने आरक्षित भूखंडावर झालेली बेकायदा बांधकामे तोडल्या नंतर देखील काहींनी पुन्हा अतिक्रमण करून कब्जा घेतला होता. वरिष्ठांच्या आदेशा नंतर गुरुवारी प्रभाग अधिकारी स्वप्निल सावंत यांनी काशीमीरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर पोलिसांनी विलास राऊत, अनिता जैसवाल, मनोज चौहान, सुनील मौर्या, गुड्डी चौहान, संजय पासवान, गुलाम शेख, कुसुम विश्वकर्मा, दिपक पासवान, प्रेम चौहान, संगीता सरोज, दिलीप गुप्ता, मोईनुद्दीन सय्यद, सोनी साहू, मोजेफ टोपारी, तिरेश टोपारी अश्या १६ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.