पुणे : तक्रार देवूनही आरोपीवर कारवाई का केली नाही? अशी विचारणा करीत दोन महिलांनी पोलीस चौकीमध्ये गोंधळ घातला. तसेच महिला पोलीस कर्मचाऱ्यांस धक्काबुक्की केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी भवानी पेठेतील लक्ष्मीमाता मंदिराजवळ राहणा-या दोन महिलांविरोधात खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक निलम शिंदे यांनी धक्काबुक्की झाली असून याबाबत त्यांनी फिर्याद दिली आहे. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास खडक पोलीस स्टेशनमध्ये हा प्रकार घडला. फिर्यादी या खडक पोलीस ठाणे अंकित काशेवाडी पोलीस चौकी येथे कार्यरत आहेत. रविवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास दोन महिला चौकीमध्ये आल्या. त्यांनी काल रात्री मी दिलेल्या तक्रारीचे तुम्ही काय केले? आम्हाला शिवीगाळ करणा-या महिला मोकाट फिरत आहेत, तुम्ही त्यांच्यावर कारवाई का केली नाही ? अशी विचारणा करीत फिर्यादी शिंदे यांना अपशब्द वापरून गोंधळ घालण्यास सुरूवात केली. तसेच ड्युटी अंमलदार पोलीस हवालदार दिघे यांच्याकडील अदखलपात्र रजिस्टर आणि ड्युटी रजिस्टर ओढून घेत खाली फेकले.
फिर्यादींंनी महिलांना शांत बसण्यास सांगितले असता त्यांनी शिंदे यांचे हात पकडून त्यांची कॉलर धरून त्यांना धक्काबुक्की केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. धमकी देणे हल्ला करणे तसेच शासकिय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोन्ही महिलांवर गुन्हे दाखल केरण्यात आले आहेत. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. डी. पोमण करीत आहेत.