अजित पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल, शिक्रापूर येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 05:38 PM2020-07-18T17:38:03+5:302020-07-18T17:38:14+5:30
या महिलेने फेसबुकवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर नेत्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य आणि शिवीगाळ केली
शिक्रापूर: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी सरपंच तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते स्वप्नील अरुण गायकवाड (वय ३२, रा. कोंढापुरी ता. शिरूर जि. पुणे) यांनी याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोंढापुरी (ता. शिरूर) ग्रामपंचायतचे माजी सरपंच तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते स्वप्नील गायकवाड हे त्यांचे फेसबुक अकाउंट तपासात असताना त्यांना त्यांच्या फेसबुकवर संगीताताई वानखेडे या महिलेने लाईव्ह येऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर नेत्यांबद्दल आक्षेपार्य वक्तव्य आणि शिवीगाळ केल्याचे दिसून आले.
त्यांनतर माजी सरपंच तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते स्वप्नील गायकवाड यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे माहिती दिली .याबाबत शिक्रापूर पोलिसांनी संगीताताई वानखेडे या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहे.