बीड: अवैध दारु बनवून विक्री करणारा माफियांविरुध्द कारवायांची मोहीम सुरुच असून परळीतील आणखी एक कुख्यात दारुविक्रेत्याची रवानगी २८ ऑक्टोबरला औरंगाबादेतील हर्सूल कारागृहात करण्यात आली. एमपीडीएनुसार त्याच्यावर बडगा उगारण्यात आला आहे. भास्कर माणिक फड (५२, रा.स्नेहनगर, परळी) असे त्या आरोपीचे नाव आहे. हातभट्टी तयार करणे, चोरटी विक्री करणे अशा प्रकारचे त्याच्यावर आठ गुन्हे नोंद आहेत. सात गुन्हे न्यायप्रविष्ठ असून एका गुन्हा तपासावर आहे. त्याच्यावर तीन वेळा प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. मात्र, त्यानंतरही त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नाही.
दरम्यान, त्याच्यावर एमपीडीएअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव शहर ठाण्याचे पो.नि. सुरेश चाटे यांनी अपर अधीक्षक कविता नेरकर, प्रभारी उपअधीक्षक स्वप्नील राठोड यांच्यामार्फत पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना पाठविला. ठाकूर यांनी हा प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी २८ ऑक्टोबरला एमपीडीएनुसार कारवाईचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.सतीश वाघ, शहर ठाण्याचे पो.नि. सुरेश चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक भार्गव सपकाळ, पो.ना.किशोर घटमळ, विष्णू फड, हवालदार अभिमन्यू औताडे यांनी ताब्यात घेऊन हर्सूल कारागृहात स्थानबध्द केले.