Crime News : गुजरातच्या सुरेंद्रनगरमधून अतिशय लाजीरवाणी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील थानगड परिसरात दीड वर्षीय मृत मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. मुलीच्या जन्मापासूनच तिच्या हृदयात छिद्र होते, यामुळे 25 फेब्रुवारी रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्याच दिवशी तिच्यावर दफनविधी करण्यात आला होता.
दुसऱ्या दिवशी म्हणजेच, 26 फेब्रुवारीला कुटुंबीय दफन केलेल्या ठिकाणी पोहोचले तेव्हा तेथील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. मुलीचा मृतदेह जमिनीवर पडलेला दिसला आणि तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता. यानंतर त्यांनी तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली. मुलीच्या नातेवाईकांनी बलात्काराची भीती व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असता मृतदेहासोबत बलात्काराची शक्यता डॉक्टरांनीही व्यक्त केली. हे घृणास्पद कृत्य करणारा कोण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.
यापूर्वी बोताद शहरात नऊ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना समोर आली होती. भगवानपारा भागात एका निर्जन ठिकाणी मुलीचा मृतदेह आढळून आला होता. यानंतर स्थानिकांनी पोलीस ठाण्याबाहेर निदर्शने केली आणि दोषीला तात्काळ अटक करण्याची मागणी करत रास्ता रोको केला. हे प्रकरण गांभीर्याने घेत पोलिसांनी तपास सुरू केला आणि 39 वर्षीय आरोपीला अटक केली. चौकशीत आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करून कारागृहात रवानगी करण्यात आली.