मीरारोड - भाईंदर मध्ये घरफोडी करणाऱ्या तिघा राजस्थानी घरफोड्यांना नवघर पोलिसांनी अटक केली असून त्यातील एक आरोपीवर तब्बल २२ गुन्हे विविध राज्यात दाखल आहेत.
गेल्या वर्षी ६ डिसेम्बर रोजी भाईंदर पूर्वेच्या विमल डेअरी मार्गावर राहणाऱ्या ईशा दवे ह्या इंद्रलोक भागात खोली पाहण्यासाठी गेल्या असता घरफोड्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा तोडून आतील कपाटातून ५ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्या - चांदीचे दागिने चोरून नेले होते . नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे निरीक्षक प्रकाश मासाळ व सपोनि योगेश काळे, उपनिरीक्षक अभिजीत लांडे सह भुषण पाटील, गणेश जावळे, संदिप जाधव, सुरज घुनावत, ओमकार यादव, विनोद जाधव यांच्या पथका कडे तपास सोपवला होता .
घरफोडी प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळावरील पुरावे व तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्हयाचा तपास केला असता आरोपी हे राजस्थान, हैद्राबाद व कर्नाटक राज्यामध्ये असल्याचे आढळत होते . पोलिसांनी ६ मे रोजी भरतकुमार मोतीराम कुमावत (३३) व चेलाराम मोडाराम देवासी (२४) , दोघेही रा. जि. पाली, राज्यस्थान यांना अटक करण्यात आली.
अटक आरोपींची कसून चौकशी केली असता गुन्ह्यातील आणखी एक पाहिजे आरोपी हकमाराम चौधरी रा. जालोर, राज्यस्थान याच्या सोबत मिळून तिघांनी घरफोडी केल्याची कबुली दिली. तसेच सदर गुन्हयात चंदनसिंग भवरसिंग राजपुत (३६) रा. जि. राजसमंद, राजस्थान याचा सहभाग निष्पन्न झाल्याने ११ मे रोजी पोलिसांनी त्याला सुद्धा अटक केली . तपासात आरोपीं कडून चोरलेल्या मुद्देमाल पैकी ४ लाख ७ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. गुन्हयातील अटक आरोपी भरतकुमार चौधरी हा अट्टल घरफोड्या असून त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र व हैद्राबाद भागातील विविध पोलीस ठाण्यात घरफोडीचे तब्बल २२ गुन्हे दाखल आहेत . तसेच काही न्यायालयांनी त्याच्यावर अजामीनपात्र वॉरंट जारी केले असल्याचे पोलिसांनी सांगितले .